संस्थानकालीन राजवाड्यावर पारंपारिक पूजन
कार्तिकवारीनंतर सावंतवाडीमार्गे मळगांवकडे प्रस्थान
सावंतवाडी । प्रतिनिधी : श्री क्षेत्र मळगांव येथील तत्कालीन थोर संत श्री गोपाळबोध बुवा यांनी आपल्या कारकिर्दीत सुरू केलेल्या कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर मळगावच्या पालखीची परंपरेप्रमाणे सावंतवाडी शहरात परिक्रमा पूर्ण झाली. तत्पूर्वी संस्थानकालीन ऐतिहासिक राजवाड्यावर पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. याच राजवाड्यावर श्री संत गोपाळ बोध बुवा यांच्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांच्या रूपात कीर्तन केल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे.
कार्तिक वारीनंतर मळगाव येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरातील ही पालखी सावंतवाडी शहरात दाखल झाली. राजवाड्यावरील पूजनानंतर या पालखीची सावंतवाडी शहरात परंपरेप्रमाणे परिक्रमा पूर्ण झाली. यावेळी भाविका भक्तांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर रात्री उशिरा पालखीचे मळगाव येथे प्रस्थान करण्यात आले.
श्री संत गोपाळ बोध बुवा यांनी कोकण गोवा कर्नाटक प्रांतात विठ्ठल भक्ती रुजविण्याचे फार मोठे कार्य केले. गुरु आज्ञेप्रमाणे श्री गोपाळ बोध यांनी आयुष्यभर पंढरपूर आषाढी व कार्तिकी वारी केल्या. आजही परंपरेने पालखी कार्तिकीवारी नंतर मळगांवहून निघते व कोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावात फिरून परुळे येथे थांबते.
पालखी फिरविण्याची परंपरा केव्हा सुरू केली याची नेमकी नोंद नाही. कोकणात बऱ्यापैकी प्रस्थापित झाल्यावर त्यांनी पालखी सुरू केली असावी ही पालखी मळगावहून मार्गशीर्ष कृष्ण पंचमीस निघते व मार्गशीर्ष वद्य १४ ला समाराधनेने थांबते.
झाराप, साळगाव, बिबवणे, पिंगुळी, गोंधयाळे, वालावल, हुमरमळा, पाट, तारकर्ली, कर्ली, देवबाग, मालवण, मांगली, नेवाळे, तेरावळे, कोंड – चिंदर – शेळपी, कोचरे म्हापण, केळूस, बांगलाची राई, निवती, श्री हरिचरण गिरी मठ, वायंगणी, श्री मठ संस्थान दाभोली, वेतोरा, तेंडोली, नेरूर, बांबुळी, कुडाळ नेमळे असे करत नंतर ही पालखी मळगाव मुक्कामी येते. ही परंपरा आजही अखंडितपणे सुरू आहे.
Sindhudurg