राजापुरातील रिफायनरी प्रकल्पावरून उ. बा. ठाकरे गटाचे आ. राजन साळवींची पुन्हा एकदा कोलांटी उडी

पक्षात एकाकी पडल्याने आ. साळवींचे घुमजाव

राजापूर | प्रतिनिधी : तालुक्यात बारसू, सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनावरून पुन्हा एकदा उ. बा. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी कोलांटी उडी मारली आहे. मतदार संघाचा विकास आणि रोजगार निर्मिती या मुद्यांवर या प्रकल्पाचे जाहिर समर्थन करणाऱ्या आ. साळवी यांनी आता आपली भूमिका अचानकपणे बदलली आहे. त्यामुळे यापुर्वी नाणार येथील प्रकल्पावरून आ. साळवी यांनी जे केले तेच आता पुन्हा ते बारसू येथील प्रकल्पबाबत करत कोलांटी उडी मारत असल्याच्या प्रतिक्रिया राजापूर वासीयांतुन व्यक्त होत आहेत.

या प्रकल्पाचे जाहिर समर्थन करणाऱ्या आ. साळवी यांनी अशी अचानक पलटी कशी काय मारली? असा सवाल आता प्रकल्प समर्थकांतुन उपस्थित केला जात असून आपल्या राजकिय सोयीप्रमाणे आपली भूमिका बदलणाऱ्या आ. साळवींविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सन 2017 मध्ये तत्कालीन भाजपा शिवसेना सरकारने आणि शिवसेनेचेच उद्योगमंत्री असलेल्या सुभाष देसाई यांनी नाणार परिरसातील 14 गावांमध्ये ग्रीन रिफायनरी प्रकल्पाची घोषणा केली व त्याची अधिसूचना काढली. यानंतर या प्रकल्पाला स्थानिक जनतेने विरोध केला. मात्र या प्रकल्पाच्या विरोधाच्या पार्श्वभूमिवर सरकारने प्रकल्प विरोधकांशी संवाद साधण्यासाठी पुढाकार घेतला. त्यावेळी उदयोगमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत काही प्रकल्प समर्थकांसोबत आ. साळवी यांनी उपस्थित राहून प्रकल्प राबवायचा असेल तर या 27 मागण्यांचा प्राधान्याने विचार करावा असे निवेदन उद्योगमंत्र्यांना दिले. या बैठकीला आ. साळवी यांनी प्रकल्प समर्थकांची बाजू घेत प्रकल्पाचे समर्थन केले होते. त्यावेळी आ. साळवी यांनी घेतलेल्या या समर्थनाच्या भूमिकेचे तीव्र पडसाद प्रकल्प विरोधकांमध्ये उमटले होते. अशाच डोंगर दत्तवाडी येथे आयोजित प्रकल्प विरोधकांच्या बैठकीत गेलेल्या आ. साळवी यांचा प्रकल्प विरोधी नेत्याने शिवसेनेच्याच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समोर अवमान करून बैठकीतुन बाहेर जाण्यास सांगितले होते. तर प्रकल्पाचे समर्थन केले म्हणून आ. साळवींची प्रतिकात्मक प्रेतयात्राही काढण्यात आली होती. या ठीकाणीही कधी समर्थन तर कधी विरोध अशी दुटप्पी भूमिका आ. साळवी यांनी घेतली.

मात्र कायमच भावनिक राजकारण करून आपला राजकिय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने मोठया प्रमाणावर जनतेचा नाणार प्रकल्पाला विरोध होताच आपली भूमिका बदलली आणि आंम्ही जनतेसोबत अशी टीमकी वाजवत त्यावेळी निवडणूकांच्या तोंडावर दबावाचे राजकारण करत नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द केली. त्यावेळी प्रारंभी या प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या आ. साळवी यांनी वारं बदलताच घुमजाव करत विरोधाची भूमिका घेतली.

त्यानंतर आता बारसू बाबतही आ. साळवींची दुटप्पी भूमिका पुढे आली आहे. सोलगाव परिसरात 2700 एकर जागा तत्कालीन शासनाकडून एमआयडीसाठी संपादित करण्यात आली आहे. ही एमआडीसी आपणच मंजूर केल्याचे आ. साळवी यांनी त्यावेळी सांगितले होते. मात्र रिफायनरी प्रकल्पाची नाणारची अधिसूचना रद्द होऊन मग पुन्हा नव्याने या प्रकल्पासाठी बारसू परिसरातील जागेची चर्चा होताच व त्याला विरोध होताच आ. साळवी यांनी देखील त्यावेळी आंम्ही स्थानिकांसोबत अशी भूमिका घेत प्रकल्प विरोधी भूमिका घेतली होती. मात्र बारसू परिसरात प्रस्तावीत असलेल्या या प्रकल्पाला वाढते समर्थन मिळू लागल्यावर अनेक ग्रामपंचायती, 55 सामाजिक संघटना यांनी पाठींबा जाहिर केल्यानंतर मग आ. साळवींनी या प्रकल्पाचे समर्थन केले. मतदार संघाचा विकास आणि रोजगारासाठी आपण या प्रकल्पाचे समर्थन करत असल्याचे आ. साळवी यांनी जाहिर केले.

मात्र आ. साळवी यांनी प्रकल्पाचे समर्थन करताच त्यांच्या विरोधात या भागातील प्रकल्प विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत आ. साळवी राजापुरची वाळवी अशा घोषणा देत प्रकल्प विरोधी आंदोलनात आ. साळवी यांना शिव्यांची लाखोली वाहिली. मात्र तरीही आ. साळवी ठाम राहिले होते. त्यामुळे आ. साळवींच्या भूमिकेचे तालुका वासीयांनी स्वागत केले होते.

आता प्रकल्प स्थळी माती परिक्षण सुरू होताच पुन्हा प्रकल्प विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी उ. बा. ठाकरे गटाचे खा. विनायक राऊत दोन वेळा राजापुरात आले. मात्र आ. साळवी यांनी त्याची दखलच घेतली नाही, उलट ट्वीटरवर या प्रकल्पाच्या समर्थनार्थ पोष्ट टाकली. तर खा. राऊत यांना पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर सोपस्कार म्हणून ते पोलीस स्थानकात आले होते. मात्र प्रकल्प विरोधाबाबत त्यांनी अवाक्षरही काढले नाही.

आता पुन्हा एकदा आ. साळवी यांनी पलटी मारली आहे. प्रकल्प विरोधी सुरू असलेले आंदोलन, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा दौरा या पार्श्वभूमिवर कोलांटी उडी मारली आहे. जनतेशी संवाद साधून प्रशासन यातून मार्ग काढेल, असे मला वाटले होते. मात्र तसे न होता आंदोलकांना ज्या पद्धतीने मारहाण झाली त्याचे समर्थन मी करू शकत नाही. म्हणून मी या भूमिकेवरून माघार घेतली आहे. येत्या शनिवारी ठाकरे बारसूमध्ये येणार आहेत. त्या वेळी ते देतील तो आदेश मला मान्य राहील असे सांगत आता आ. साळवी यांनी पुन्हा एकदा प्रकल्प विरोधी भूमिका घेतली आहे.

अशा प्रकारे कधी समर्थन तर कधी विरोध अशी वारंवार आपली भूमिका बदलणाऱ्या आ. साळवी यांच्या विरोधात राजापुरवासीयांतुन तीव्र संताप व्यक्त होत आहे. मतदार संघाला विकासापासून वंचित ठेवलेच पण कोणताही प्रकल्प आणला नाही, भरीव असे कोणतेच काम आ. साळवी यांनी केले नाही. मात्र राजकिय स्वार्थासाठी वारंवार आपली भूमिका बदलत जनतेमध्ये सभ्रम निर्माण करण्याचे काम आ. साळवी यांनी केल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

पक्षात एकाकी पडल्याने आ. साळवींचे घुमजाव

कोकणात कोणताही प्रकल्प येवा, त्यावरून राजकारण करत आपली राजकिय पोळी भाजण्याचे काम उ. बा. ठाकरे यांच्या शिवसनेने केलेले आहे. ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या आडूनही तेच सध्या त्यांचे सुरू आहे. खुद्द पक्ष् प्रमुख व तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांनीच पंतप्रधानांना पत्र लिहून बारसूत हा प्रकल्प राबवावा असे कळविलेले आहे. आता तेच पुन्हा विरोध् करत आहेत. खुद्द पक्ष प्रमुखांना या प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतल्याने आ. साळवी हे पक्षात एकाकी पडले आहेत. त्यामुळेच आता त्यांनी घुमजाव करत या प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतल्याची चर्चा राजकिय वर्तुळात होत आहे.