प्रेम संबंधातील संशयावरुन प्रियकराचा प्रेयसीवर जीवघेणा हल्ला

दोडामार्ग माटणेतील खळबळजनक घटना

संशयित युवकाला अटक : तालुक्यात खळबळ

दोडामार्ग (प्रतिनिधी) :

     प्रेम संबंधातून संशय घेत प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना माटणे गावात घडली आहे. याप्रकरणी मनोहर अशोक गवस (२४, रा. आंबडगाव) याला दोडामार्ग पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, माटणे गवाळ येथील काजू बागेत २३ वर्षीय युवतीवर संशयित मनोहर गवस याने प्रेम संबंधातून संशय घेत डोक्यावर व हातावर लोखंडी हातोडीने हल्ला केला. तसेच पेट्रोल किंवा रॉकेल यासारख्या ज्वलनशील पदार्थ टाकून लायटरच्या सहाय्याने पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित युवतीने कसाबसा पळ काढून आपला जीव वाचविला. सध्या तीच्यावर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून तीच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.
याबाबतची फिर्याद मंगळवारी रात्री उशिरा दोडामार्ग पोलीसात संबंधित युवतीने दाखल केली. त्यानुसार संशयित मनोहर गवस याला पोलीसांनी अटक केली. पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकूर अधिक तपास करीत आहेत.