सावत्र बापाकडून आपल्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे ओरोस येथील विशेष न्यायालयाचे आदेश

वेंगुर्ले :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका गावात सावत्र बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीला धाक दाखवत तसेच शिवीगाळ व मारहाण करीत तब्बल वर्षभर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला पोलिसांनी ओरोस येथील विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पीडित मुलीने सावत्र बाप घरी नसल्याची संधी साधून पोलीस स्टेशन गाठत आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढा पोलिसांसमोर वाचला. पीडितेच्या तक्रारीनुसार सावत्र बापावर गुन्हा दाखल झाला असून त्याला तात्काळ अटक करण्यात आली.

पिडीत मुलीच्या आईने परजिल्ह्यातील एका प्रौढासोबत दुसरे लग्न केले होते. सदर प्रौढाने त्या महिलेचा अल्पवयीन मुलीसह स्वीकार केला होता. काही दिवस पीडित अल्पवयीन मुलगी व तिची आई सावत्र बापाच्या परजिल्ह्यातील घरी राहिली होती. त्यानंतर तो सावत्र बाप त्या दोघांना घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन राहत होता. गेल्या वर्षभरात त्याने आपल्या सावत्र मुलीला धाक शिवीगाळ बरोबरच मारहाण करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अखेर सावत्र बापाच्या किळसवाण्या प्रकाराला कंटाळून सदर पीडित मुलीने पोलीस स्टेशन गाठले आणि सदर प्रकाराबाबत तक्रार दिली.