वैद्यकीय अधिक्षक धर्माधिकारी यांना फोनवरून घेतले फैरावर..!
उद्या तातडीने सेवेत हजर होण्याचा दिला इशारा..!
कणकवली : वागदे लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाला होता. त्यात टेम्पोतून प्रवास करणाऱ्या लोकांना गंभीर दुखापत झाली होती. आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी सकाळी थेट कणकवली उपजिल्हा रुग्णालयात भेट दिले आणि अपघातग्रस्त जखमी रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार सुरू आहेत याचा आढावा घेतला.
तसेच कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेचा आढावा देखील घेतला. यावेळी त्यांना येथील वैद्यकीय अधीक्षक वारंवार सुट्टीवर जात असल्याची तक्रार उपस्थित रुग्ण आणि नातेवाईकांनी केली. यावर आमदार नितेश राणे यांनी वैद्यकीय अधीक्षकांना फोन लावून त्यांना चांगलेच फैलावर घेतले.
आपण आपत्कालीन सेवेत आहोत, जनतेचे सेवक आहोत याचे भान ठेवा असे खडेबोल देखील सुनावले. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात येण्यापूर्वी आमदार नितेश राणे यांनी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे उपचारासाठी दाखल असलेल्या अपघातातील जखमींची देखील चौकशी केली. या अपघातातील १६ जखमी कणकवली येथे उपचारासाठी दाखल असून १० जखमी जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. याशिवाय एक अति गंभीर जखमी रुग्ण गोवा – बांबोळी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. गोव्यातील जखमीची देखील भेट घेणार व गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून तेथे उपचारासाठी दाखल करावे लागत असल्यास तिथे तशी सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे देखील आमदार नितेश राणे यांनी उपजिल्हा रुग्णालयातील आढाव्या दरम्यान सांगितले.
यावेळी आमदार नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, शहराध्यक्ष अण्णा कोदे, सचिन पारधिये, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शशिकांत राणे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.