जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठीच निवडणुकीच्या रिंगणात : अर्चना घारे

माझी लढाई ही कोकणच्या स्वाभिमानाची व अस्मितेची

सावंतवाडी । प्रतिनिधी :
माझी लढाई ही कोकणच्या स्वाभिमानाची आणि अस्मितेची आहे त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातील माघार घेणार नाही हा जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी मी निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले त्यामुळे जनतेचा आशीर्वाद आणि प्रेम मला विजयापर्यंत घेऊन जाणार, असा विश्वास महाविकास आघाडीच्या बंडखोर उमेदवार अर्चना घारे परब यांनी केला. तर मला मिळालेले पाकीट (लिफाफा) या चिन्हात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विकासाचे रोड मॉडेल असणार आहे त्यामुळे निश्चितच ते प्रत्येकाच्या घराघरात पोहोचेल, असेही त्या म्हणाल्या.

सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, अपक्ष उमेदवारी दाखल करताना जनतेच्या भावना लक्षात घेऊन आपण त्यांना शब्द दिला होता. तो शब्द पूर्ण करण्यासाठी मी माझ्या उमेदवारीवर थांब राहिले माझ्यावर या काळात दबाव आला अनेकांचे फोन आले पण विचलित नव्हता. मी माझा उमेदवारी अर्ज कायम ठेवला माझा लढा हा कोकणच्या विश्वासाचा स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा आहे. त्यामुळे जनतेमधून मला चांगल्या भावना ऐकायला मिळत आहे.लोकांचे फोन आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत बरेच जण मला प्रत्यक्ष भेटून पाठिंबा देत आहेत. त्यामुळे माझा विजय हा निश्चितच आहे.

त्यापुढे म्हणाल्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही याचे मला दुःख आहे. परंतु मी पक्षाच्या नेत्यांवर नाराज नाही. त्यांच्याच आशीर्वादाने मी राजकारणात इथपर्यंत आले. त्यामुळे त्यांची भूमिका ही चुकीची आहे, असे मी म्हणणार नाही. परंतु काही झाले तरी राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि नेते माझ्या पाठीशी आहेत आणि राहणार यात किंचितही संशय नाही. विकासाचा मुद्दा घेऊन मी जनतेपर्यंत पोहोचणार आहे, असे त्या म्हणाल्या.

मला मिळालेले लिफाफा हे चिन्ह घराघरात पोहोचवणार आहे कारण माझा लिफाफा हा निश्चितच इतरांपेक्षा जड असणार आहे त्यामध्ये सावंतवाडी मतदारसंघातील समस्या तसेच मतदारसंघाचे व्हिजन असणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

अर्चनाताईंचा निर्णय योग्यच..
राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाच्या वतीने ताईंना उमेदवारी मिळाली नसली तरी त्यांच्या विजयासाठी आम्ही अहोरात्र झटणार आहोत आज पक्षाचे वरिष्ठ नेते महाविकास आघाडीच्या माध्यमातून बाजू मांडत असताना ताईंनी घेतलेला हा निर्णय आम्हा कार्यकर्त्यांच्या हिताचा आणि भवितव्याचाच असून आम्ही त्यांच्या पाठीमागे ठाम राहणार आहोत, असे यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी सांगितले.