संशयिताच्या मुलालाही घेतले चौकशीसाठी ताब्यात
सावंतवाडी । प्रतिनिधी : ओवळीयेचे माजी उपसरपंच लवू सावंत यांच्या खून प्रकरणी पोलिसांच्या अटकेत असलेल्या संशयित अजित सावंतची पोलिस कोठडीची मूदत संपल्याने त्याला आज येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुरावे गोळा करणे, तसेच अन्य काही बाबींचा तपास पूर्ण करण्यासाठी पोलीसांनी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती.
दरम्यान, संशयित अजित सावंतच्या मुलाला गुरुवारी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. घटनेच्या दिवशी तो मुंबई येथून गावी आला होता. मात्र, रात्री उशिर झाल्याने तो कारिवडे पेडवेवाडी येथे नातेवाईकांकडे थांबला होता. त्यामुळे या घटनेत त्याचा काही सहभाग आहे का या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.
सावंत कुटुंबियांनी मात्र पोलिसांच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून लवू सावंत यांच्या निधनामुळे आम्ही दुःखात असताना अशा प्रकारे चौकशी सत्रामुळे आम्हाला नाहक त्रास होत असल्याचे म्हटले आहे. तर खून प्रकरणी आम्ही काही संशयितांची नावे पोलिसांना दिली असली तरीही त्याबाबत पोलीसांकडून तपास होत नसल्याचेही म्हटले आहे.