विरोधकांच्या फेक नरेटिव्हचा शिवसेनेकडून पोलखोल
दोडामार्ग : प्रतिनिधी
आडाळी एमआयडीसी प्रश्नावरून विरोधकांकडून फेक नरेटीव्ह पसरविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. प्रत्यक्षात मात्र उद्योगधंदे सुरू होण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा पूर्णत्वाकडे आल्या आहेत. एमआयडीसी परिसरात रस्ते व पाणी सुविधा पूर्ण झाल्या असून वीज सब स्टेशन उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. याबाबत पत्रकारांना कामांची प्रत्यक्ष परिस्थिती दाखवून शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस व उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर यांनी विरोधकांच्या टीकेची पोलखोल केली.
गणेशप्रसाद गवस म्हणाले, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी दोडामार्ग तालुक्याची निर्मिती केली. उद्योग मंत्री असताना त्यांनीच आडाळी एमआयडीसी मंजूर केली. त्यानंतर ७०० एकर भूसंपादन प्रक्रियाही वेगात पूर्ण झाली. मात्र, कोरोना काळात एमआयडीसीचे काम काही वर्षे रेंगाळले. रस्ते, वीज व पाणी या पायाभूत सुविधा असल्याशिवाय उद्योगधंदे सुरू होत नाहीत. यासाठी कडशी नदीवर सिमेंट नाला बंधारा उभारण्यात आला आहे. त्यालगत विहिरीचे कामही पूर्ण झाले असून पाणी साठवण टाकी उभारण्यात आली आहे. एमआयडीसी परिसरात सुमारे २२ कोटी रुपये खर्च करून अंतर्गत रस्ते निर्माण केले आहेत. ३० कोटी रुपये खर्च करून वीज सब स्टेशन उभारणीचे कामही प्रगतीपथावर आहे.
राजेंद्र निंबाळकर म्हणाले, खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यात करोडो रुपयांची विकासकाने झाली आहेत. आडाळी एमआयडीसी परिसरात पायाभूत सुविधा पूर्ण झाल्याने ५४ उद्योजकांनी भूखंड बुकिंग केले आहेत. निधी अभावी कोणतीही कामे रखडलेली नाहीत. फेक नरेटीव्ह करून युवकांना भडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. उद्योग येण्यासाठी सकारात्मक वातावरण आपणच तयार केले पाहिजे. भौगोलिक व सामाजिक वातावरण पाहूनच उद्योजक गुंतवणूक करीत असतात हे विरोधकांनी लक्षात घ्यावे असा सल्ला दिला.
यावेळी राजेंद्र निंबाळकर यांनी राजन तेली व विशाल परब यांच्यावरही सडकून टीका केली. राजन तेली सत्तेत असताना लाँग मार्च काढला. आडाळीत उद्योग येण्यासाठी प्रयत्न करण्याची त्यांचीही जबाबदारी होती. केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न झाला. तिकीट मिळविण्यासाठी त्यांचे ऊबाठा प्रवेशाचे राजकीय गणित पूर्णपणे फसले आहे. विशाल परब बाऊन्सर घेऊन फिरतात. इतक्या कमी वयात ते कोणते उद्योग करून अब्जाधीश झाले तो यशाचा मंत्र येथील युवकांना द्यावा असा टोला लगावला.
गोपाळ गवस म्हणाले, वीज, पाणी व रस्ते सुविधा पूर्ण झाल्याने येत्या काळात प्रत्यक्षात उद्योग सुरू होतील. या भागातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. विरोधकांच्या खोट्या आमिषांना बळी न पडता मतदारांनी महायुती उमेदवार दीपक केसरकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले. यावेळी शिवसेना विभाग प्रमूख रामदास मेस्त्री, संजय गवस, विनायक शेट्ये, युवा सेना तालुका प्रमुख भगवान गवस, माजी सरपंच नंदू गावकर उपस्थित होते.