दोडामार्ग | सुहास देसाई : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी तुटपुंज्या रकमेने खरेदी करून कंपनींना जादा रकमेने विकून काहींनी कोट्यावधी रुपये कमविले आहेत. हाच पैसा आता विधानसभा निवडणूका लढविण्यासाठी ते वापरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अशा माफियांना यापुढे तालुक्यात येऊ देऊ नका. अन्यथा भविष्यात अजूनही येथील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होऊ शकते, असे मत महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांनी सरगवे येथे व्यक्त केले.
सरगवे पुनर्वसन येथील खंडोबा सभागृहात बुधवारी त्यांची प्रचार सभा संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. सोबत जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, चंद्रकांत तथा बाळा गावडे, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, महिला जिल्हाप्रमुख निता कविटकर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सत्यवान गवस, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र निंबाळकर, तुकाराम बर्डे, दादा देसाई, उपतालुकाप्रमुख तिलकांचन गवस, रामदास मेस्त्री, सूर्यकांत गवस, चंदू मळीक, विठोबा पालयेकर, दया धाऊस्कर, आयनोडे सरगवे झरे पुनवर्सन सरपंच सौ श्रुती देसाई, अन्य गावचे उपसरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते. श्री. केसरकर म्हणाले की, तालुक्यातील प्रत्येक गावावर माझे प्रेम आहे. मी, मंत्री झाल्यापासून ज्या ठिकाणी विकास कामांसाठी निधी मागितला गेला, त्यासाठी मी भरघोस निधी दिलेला आहे. आतापर्यंत झालेली कामे मी माझ्या कारकिर्दीत केली आहेत. तरीही विरोधक टीका करीत आहेत. मात्र, त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून मी माझे काम करत आहे.
राजेंद्र म्हापसेकर म्हणाले, राजन तेली अत्यंत खोटारडा माणूस आहे. त्यांना जनतेचे काहीही देणेघेणे नाही. त्यांनी फक्त भांडणे लावायची कामे केली. विकासाबद्दल त्यांना काहीही माहित नाही. आपापसात भांडणे लावून त्यावर पोळी भाजून घेण्याचे काम राजन तेली यांनी केल्याचा गंभीर आरोप म्हापसेकर यांनी केला. सरगवे पुनर्वसन, पिकुळे अशा अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या सभा झाल्या.