केसरकर यांचा महाविकास आघाडीला पुन्हा धक्का

 

काँग्रेसचे पदाधिकारी माजी उपसभापती सिद्धेश परब शिवसेनेत दाखल

काँग्रेस व उबाठा सेनेतील १०० हून अधिक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कॉग्रेसला मोठा धक्का दिला आहे. वेंगुर्ला येथील कॉग्रेसचे पदाधिकारी पंचायत समितीचे माजी उपसभापती सिद्धेश परब यांनी आज केसरकर यांच्या उपस्थितीत हाती शिवधनुष्य घेतले. त्यांच्यासह काँग्रेस व उबाठा सेनेतील १०० हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

 

 

सिद्धेश परब यांच्यासह शिरोडा उपसरपंच चंदन हाडकी, ग्रामपंचायत सदस्या अनिषा गोडकर, पांडुरंग नाईक, आरवली माजी उपसरपंच मयूर आरोलकर यांच्यासह १०० हून अधिक जणांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हा संघटक संजू परब, भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले, माजी सभापती बाळा गावडे, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, शिरोडा सरपंच लतिका रेडकर, परिक्षित मांजरेकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सिद्धेश परब म्हणाले, आजवर काँग्रेसच्या संघटनेत आम्ही प्रामाणिकपणे काम केलं. आमच्या पक्षाचा उमेदवार असावा यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. मात्र, उबाठा शिवसेनासोबत आल्यानंतर आमच्यावर अन्याय झाला. कोकणात एकही उमेदवार काँग्रेस पक्षाला दिला नाही. सावंतवाडीत उमेदवार असताना देखील ‘फिरता चषक’ राजन तेलींना प्रवेश देऊन महाविकास आघाडीची उमेदवारी दिली. संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याने आम्ही नाराज होतो. म्हणूनच आज मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत आम्ही शिवसेनेत प्रवेश केला, असे ते म्हणाले.
मंत्री दीपक केसरकर यांच्यावर आमचा विश्वास असून ते निश्चितच राहीलेली विकास कामे पूर्ण करतील. स्थानिक आमदार सोबत असल्याने जनतेची सर्व कामे आम्ही मार्गी लावू. राजन तेलींसारखा विरोध करायचा आणि नंतर भुमिपूजनाला मांडीला मांडी लावून बसायचं अशी आमची भूमिका नाही. निकालाच्या दिवशी आमची ताकद दिसून येईल. रेडी जिल्हा परिषद मतदारसंघ दीपक केसरकर यांच्या पाठीशी उभा असून सर्वांधिक मताधिक्य तिथून देऊ, असा विश्वास यावेळी परब यांनी व्यक्त केला.

 

 

यावेळी दीपक केसरकर म्हणाले, काँग्रेसचे पदाधिकारी माजी उपसभापती सिद्धेश परब यांनी पक्षात प्रवेश केल्याने आमची ताकद आणखीन वाढली आहे. महायुतीचे राज्यात चांगलं काम सुरू आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही चालत आहोत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रात्रंदिवस काम करत असून लोकहीताच काम करत आहेत. त्यामुळे राज्यात महायुतीला मोठं यश मिळेल. युती सरकारमुळे मतदारसंघातील जनतेची सर्व काम पूर्णत्वास येत आहेत. सरकारच्या विकासात्मक योजना तळागाळापर्यंत पोहचत आहे.‌ फाईव्ह स्टार हॉटेल देखील मतदारसंघात सुरू झालं आहे. पुढील काळात सर्वांच्या सोबतीन सर्वांगीण विकास साधणार आहोत. याच जोरावर शिवसेनेत येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महायुतीचा विजय निश्चित आहे असा विश्वास
मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.