Official websites should be used for Mhada lottery
मुंबई (प्रतिनिधी) : म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे जाहीर करण्यात येणाऱ्या प्रस्तावित सदनिका विक्री सोडतीच्या पार्श्वभूमीवर मंडळाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. इच्छुक अर्जदारांनी सोडत प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळांवरूनच अर्ज नोंदणीकरण करून सोडत प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केले. अर्ज नोंदणीसाठी कोणत्याही समाजमाध्यमांची, त्रयस्थांची, संस्थांची अथवा इतर मध्यस्थांची मदत ‘म्हाडा’तर्फे घेण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
मुंबई मंडळाच्या आगामी सदनिका विक्री सोडतीच्या अनुषंगाने अनेक समाजमाध्यमे, अनधिकृत संकेतस्थळे, मुंबई मंडळाच्या येऊ घातलेल्या सोडतीबाबत ‘म्हाडा’चे बोधचिन्ह अनधिकृतरित्या वापरून म्हाडाच्या प्रकल्पांची, त्यांच्या आकारमानाची, किमतींची अवास्तव माहिती प्रसिद्ध करीत असल्याचे मंडळाच्या निदर्शनास आले आहे. ही समाजमाध्यमे नागरिकांना विशिष्ट लिंक पाठवून क्लिक करण्याबाबत सूचित करीत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्याकरिता मंडळातर्फे आवाहन केले आहे की, म्हाडातर्फे कोणतेही व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आलेले नाहीत. तसेच कोणत्याही संकेतस्थळाला माहिती देण्यात आलेली नाही. अशा प्रकारे प्राप्त झालेल्या व्हाॅट्सअॅप ग्रुप्स अथवा संकेत स्थळावर जोडण्याकरिता प्राप्त झालेल्या लिंकवर सहभाग घेऊ नये, कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये तसेच कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये, या माध्यमातून नागरिकांची फसवणूक झाल्यास अथवा इतर कोणत्याही व्यवहारास मंडळ अथवा म्हाडा प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
सदनिका विक्रीकरिता मंडळाकडे निश्चित प्रणाली कार्यरत आहे. सदनिका विक्री सोडतप्रक्रियेत सहभागी होण्याकरिता https://www.mhada.gov.in तसेच https://housing.mhada.gov.in याच म्हाडाच्या अधिकृत संकेत स्थळांचा वापर करावा, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.












