देश विकासात सीए इन्स्टिट्यूटचे योगदान- डॉ. पी. पी. कुलकर्णी

Contribution of CA Institute in country development- Dr. P. P. Kulkarni

रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या सहकार्याने गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ट्रेन अॅंड लर्न हा अभ्यासक्रम यापूर्वी राबवण्यात आला होता. आता पुन्हा विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. देशविकासात योगदान देणाऱ्या सीए इन्स्टिट्यूटला गौरवशाली परंपरा आहे. आता आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारताना कौशल्याची गरज आहे. ट्रेन अॅंड लर्न या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास होईल, असे प्रतिपादन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले.

सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी सीए इन्स्टिट्यूटचे पश्चिम विभागीय समितीचे अध्यक्ष सीए अर्पित काब्रा, पश्चिम विभागीय समितीचे कोषाध्यक्ष सीए केतन सैया आणि सचिव सीए सौरभ अजमेरा यांच्यासह रत्नागिरी शाखाध्यक्ष सीए मुकुंद मराठे, उपाध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये, सचिव सीए शैलेश हळबे, कोषाध्यक्ष सीए अक्षय जोशी, विकासा अध्यक्ष सीए केदार करंबेळकर, सदस्य सीए प्रसाद आचरेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.

सीएंच्या फर्ममध्ये नोकरीसाठी कुशल व पारंगत विद्यार्थ्यांची गरज असते. लेखापरीक्षण, टीडीएस, जीएसटी रिटर्न आदी कामांसाठी आवश्यक ज्ञान लागते. त्याकरिता ट्रेन अॅंड लर्न हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांकरिता ट्रेन अँड लर्न हा नवीन कोर्स सुरू होणार आहे. यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न, टीडीएस, जीएसटी रिटर्न्स, जीएसटी रजिस्ट्रेशन, टॅली, ड्राफ्टींग ऑफ लेटर्स अशा प्रकारचा अभ्यासक्रमाचा समावेश आहे. या अभ्यासक्रमामुळे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना कॉलेज संपता संपता चांगल्या कौशल्यामुळे नोकरी मिळू शकते तसेच ते स्वतःसुद्धा ही कामे करू शकतात, असे या वेळी सांगण्यात आले.