सिंधुनगरी प्रतिनिधी
जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांची विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व्हावे यासाठी आपले प्रयत्न आहेत. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या असून यावेळी मतदानाचा टक्का वाढेल असा विश्वासही जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ३८९ जणांविरोधात प्रतिबंधक कारवाई तर जिल्ह्यातील चार जणांविरोधात हद्दपारची कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अनिल पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मतदानासाठी दोन दिवस शिल्लक असून या कालावधीत जिल्ह्यात कोठेहवी अनुचित प्रकार घडू नये,शांतता अबाधित राहावी यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज आहे. विविध ठिकाणी मतदानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्यावेळी असलेली ६६ टक्के मतदानाची टक्केवारी यावेळी वाढविण्यासाठी प्रयत्न असून यावेळी ती वाढेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उद्या मतपेट्या केंद्रावर रवाना होतील
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेसाठी ९२१ मतदान केंद्रे आहेत. या सर्व मतदान केंद्रावर उद्या मतदान यंत्रे आणि कर्मचारी रवाना होणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले
६० केंद्रावर नेटवर्क कनेक्टिव्हिटी नाही
जिल्ह्यात ९२१ मतदान केंद्रे आहेत. यापैकी ६० मतदान केंद्रावर नेटवर्क कनेक्टिव्हिटी नाही यात कणकवली विधानसभा २६, कुडाळ विधानसभा १८ आणि सावंतवाडी विधानसभा मतदार संघात १६ केंद्रांचा समावेश आहे. अशा केंद्रावर विशेष लक्ष असणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.