
आजगाव मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष अण्णा झांटये यांचे प्रतिपादन
जयवंत दळवी जन्मशताब्दी प्रित्यर्थ पुस्तक परीक्षण स्पर्धा
सावंतवाडी । प्रतिनिधी : डिजिटलचा जमाना आला असला तरीही वाचन हे अत्यावश्यक असून वाचनाने माणूस ज्ञानी होतो आणि त्याला पुस्तकाच्या रूपाने एक दिशादायक मित्र मिळतो. वाचन ही कला असून वाचनाने माणूस समृद्ध होतो. वाचन माणसाच्या जीवनाला विधायक दिशा प्राप्त करून देते. जीवनात योग्य काय याची जाणीव करून देते त्यामुळेच समाजात ‘वाचाल तरच वाचाल’ अशी म्हण प्रचलित आहे, असे प्रतिपादन आजगाव मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ अण्णा झांटये यांनी केले.
आजगाव येथील मराठी ग्रंथालय आजगाव आयोजित जयवंत दळवी जन्मशताब्दी स्मृती प्रीत्यर्थ पुस्तक परीक्षण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षस्थानवरून बोलताना अण्णा झांटये यांनी मार्गदर्शन केले.
ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लेखक जयवंत दळवी यांचे पुतणे सचिन दळवी उपस्थित होते. तर विशेष उपस्थिती माजी पंचायत समिती सदस्या मनीषा गोवेकर, विलासानंद मठकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ममता मोहन जाधव यांची लाभली.
यावेळी उपस्थित असलेले सचिन दळवी यांनी सांगितले की, जयवंत दळवी यांच्या वाङ्मयाचे अनेक पैलू आहेत. ते आपण समजून घेतले पाहिजे. सामाजिक स्थितीचे यथोचित दर्शन घडविणारे त्यांचे समृद्ध लेखन असून प्रत्येकाच्या जीवनात त्यांचे लेखन मार्गदर्शन करणारे ठरते. म्हणून विद्यार्थी आणि वाचन प्रेमी मंडळींनी जयवंत दळवी यांच्या साहित्याचा निश्चितच अभ्यास करावा, असेही आवाहन श्री दळवी यांनी यावेळी केले.
या स्पर्धेचे परीक्षण आनंद नाबर व विनायक उमर्ये यांनी केले. प्रत्येक गटात एक ते तीन क्रमांकांना बक्षिसे व भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. यावेळी आजगाव व दशक्रोशीतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
गट क्रमांक एक (इयत्ता पाचवी ते सातवी – लहान गट) – प्रथम – कणक दिनानाथ काळोजी, द्वितीय – राही प्रसाद पांढरे, तृतीय जान्हवी सचिन मुळीक.
गट क्रमांक दोन (इयत्ता आठवी ते दहावी – मोठा गट) – प्रथम – भूमी बाळकृष्ण हळदणकर, द्वितीय – हर्षाली अनिल मुळीक, तृतीय – ध्वनी दिनानाथ काळोजी.
स्पर्धेतील विजेत्यांचे मान्यवरांनी कौतुक करून त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा प्रदान केल्या.












