आशा स्वयंसेविकांसाठी आयोजित निबंध लेखन स्पर्धेत सुधा बांदेकर प्रथम…

 

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच दाभोली चे आयोजन..

वेंगुर्ले : प्रतिनिधी : आशा स्वयंसेविका यांच्यासाठी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्या वतीने आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली, वेंगुर्ला यांच्या सहकार्याने ‘स्त्रियांवरील अत्याचार: कारणे आणि उपाय’ या विषयावर आयोजित निबंध लेखन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमध्ये एकूण ७३ स्पर्धक महिला सदस्यांनी सहभाग घेत आपल्या विचारांची मांडणी केली. सदर स्पर्धेने महिलांच्या सक्षमीकरण आणि त्यांच्या विचारांची मांडणी करण्याचा एक उत्कृष्ट व्यासपीठ प्रदान केले.

 

 

या स्पर्धेत बांदा येथील सुधा बांदेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तर द्वितीय: अर्पिता अनंत गवंडे (उभादांडा), तृतीय: स्नेहल सखाराम गायचोर (परबवाडा), उत्तेजनार्थ प्रथम: राजश्री राजन पालकर (पाल – आसोली), उत्तेजनार्थ द्वितीय: संजना सदानंद बेहरे (तुळस) यांचा समावेश आहे.
आशा स्वयंसेविकांसाठी सर्वात प्रथम निबंध लेखन स्पर्धा घेण्याचा मान वेताळ प्रतिष्ठान आणि कै. गणेश दाभोलकर मेस्त्री मंच यांना मिळाला. या दोन्ही संस्थांकडून महिलांसाठी विविध निबंध लेखन स्पर्धा सातत्याने आयोजित केल्या जातात. या अगोदर शाळा व्यवस्थापन समिती महिला सदस्य, ग्रामपंचायत महिला सदस्य, अंगणवाडी ताई आणि सेविका यांच्यासाठीही निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या.
स्पर्धेतील सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक, चित्रफ्रेम, मेडल, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेचे परिक्षण मळगाव हायस्कूलच्या शिक्षिका शैलजा परुळकर आणि मिलन तिरोडकर यांनी केले.