अशा प्रकारच्या अमली पदार्थ विरोधात कठोर कारवाई करण्याची केली मागणी
शनिवारी सायंकाळी लांजा पोलीस निरीक्षक, तहसीलदार यांना निवेदन सादर
लांजा | संतोष कोत्रे
लांजा शहरात राजरोसपणे सुरू असलेल्या अमली पदार्थाची विक्री आणि सेवन यामुळे भावी पिढी या अमली पदार्थाच्या आहारी जात असून त्यामुळे पालक त्रस्त झाले आहेत. आणि अमली पदार्थाच्या सेवनामुळे गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढीस लागले आहे. मात्र या विरोधात पोलीस कठोर कारवाई करीत नसल्याचे आक्रमक झालेल्या लांजावासीयांच्या वतीने शनिवारी १३ मे रोजी सायंकाळी लांजा पोलीस निरीक्षक, लांजा तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.
दरम्यान येत्या पंधरा दिवसात लांजा शहरात बेकायदेशीरपणे होणारी अमली पदार्थ विक्री आणि सेवन याविरोधात तातडीने पावले उचलावीत अन्यथा लांजा गावातील नागरिकांच्या वतीने या विरोधात तीव्र आंदोलन उभे केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे तसेच लांजा नायब तहसील तहसीलदार उज्वला केळकर यांना याबाबत निवेदन शनिवारी सायंकाळी देण्यात आले .या निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही दिवसांपासून शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची राजुरपणे विक्री होत असून तरुण पिढी या अमली पदार्थाचे सेवन करत असल्याने पालक देखील त्रस्त झाले आहेत. तर काही ठिकाणी अमली पदार्थांच्या सेवनामुळे गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढीस लागले आहे. मात्र अशा प्रकारच्या समाजास घातक ठरणाऱ्या गोष्टींना पायबंध घालण्याऐवजी पोलिसांकडून ठोस भूमिका घेतली जात नाही.
वेळोवेळी पोलीस यंत्रनेशी येथील नागरिकांनी चर्चा विनंती करून देखील ठोस पावले उचलली जात नाहीत आणि त्यामुळेच शहरात राजरोसपणे अमली पदार्थाची विक्री, सेवन सुरू आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण पिढी आहारी जात असल्याने गुन्हेगारी च्या घटना वाढीस लागल्या आहेत.
आणि म्हणूनच भावी पिढी मोठ्या प्रमाणात या अंमली पदार्थाच्या सेवनामुळे बरबाद होत असल्याने आम्ही नागरिक हे उघडा डोळ्याने पाहू शकत नाही. म्हणूनच पुढील पंधरा दिवसात शहरातील ज्या ज्या ठिकाणी ही बेकायदेशीर होणारी अमली पदार्थाची विक्री आणि सेवन यावर तातडीने निर्बंध घालावेत. आणि लांजा शहर या अमली पदार्थाच्या विळख्यातून मुक्त करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान ग्रामस्थ आणि पोलीस यंत्रणा या दोघांच्या सहकार्याने आपण हे ही कीड नष्ट करूया असे ठोस आश्वासन यावेळी पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी लांजा वासियांना दिले.
सदर निवेदन सादर करताना प्रकाश लांजेकर सुनील कुरूप, विकास शेटे, प्रसन्न शेट्ये, संजय यादव, विजय कुरूप, अकबर नाईक, सुहास विवाळे, लहू कांबळे, रवींद्र कांबळे ,संतोष बेनकर ,राजेश हळदणकर ,योगेश वाघदरे ,,महंम्मद रखांगी ,बापू जाधव ,प्रसाद भाईशेट्ये, गजानन गुरव ,दिलीप मुजावर, नितीन शेट्ये, सुधाकर शेट्ये, राजेश राणे, राहुल शिंदे आदींसह अन्य नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते











