मसुरे | प्रतिनिधी :मालवण तालुक्यातील राठिवडे देऊळवाडी येथील रहिवासी तथा प्रसिद्ध गणेश मूर्तिकार व सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन विष्णू राठिवडेकर (४६) यांचे अल्पशा आजाराने रविवारी दुपारी उपचार चालू असताना ओरोस जिल्हा रुग्णालयात निधन झाले. मधुसूदन राठिवडेकर हे पंचक्रोशीत अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. मागील काही वर्षे त्यांनी जि.प शाळा राठिवडे नं.१ चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून चांगली कामगिरी केली होती. राठिवडे येथे होणाऱ्या सर्व धार्मिक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रमात ते नेहमीच सक्रियपणे सहभागी होत होते. ते या परिसरात उत्कृष्ट गणेश मूर्तिकार म्हणूनही प्रसिद्ध होते.
मागील दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने नातेवाईकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारार्थ दाखल केले होते. मात्र उपचाराला प्रतिसाद रविवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजई, बहिण,भाओजी, मेहुणे, पुतणे असा परिवार आहे. राठिवडे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा देवळी समाज उन्नती मंडळ शाखा मालवणचे कार्यकारीणी सदस्य कृष्णा उर्फ राजू राठिवडेकर यांचे ते कनिष्ठ बंधू होत. त्यांच्यावर सोमवारी दुपारी राठिवडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.











