सोनुर्ली गावात माकड पकड मोहीम राबवा

उपसरपंच भरत गावकर यांचे वनविभागाला निवेदन

सावंतवाडी । प्रतिनिधी : सोनुर्ली गावात माकडांकडून शेतकऱ्यांच्या शेती बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. गेले कित्येक वर्ष हा प्रकार सुरू असून वनविभागाने या माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी सोनुर्ली गावात माकड पकड मोहीम राबवावी, अशी मागणी उपसरपंच भरत गावकर यांनी उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्याजवळ केली आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी सोमवारी सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांना सुपूर्त केले यावेळी सोनुर्ली ग्रामस्थ अनंत परब, सिताराम गावकर आधी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, सोनुर्ली गावात गेली कित्येक वर्षे सातत्याने लाल तोंडाच्या माकडांचा उपद्रव सुरू आहे. गावामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या नारळ केळी काजू यांच्या बागा आहेत. याशिवाय चवळी, उडीद, कुळीथ आदींसारखी नगदी पिकेही शेतकरी घेतात. परंतु जंगल भागात राहणारी लाल तोंडाची माकडे या शेतीची मोठ्या प्रमाणात नासधुस करत आहेत. तसेच नारळाचे तर मोठ्या प्रमाणात नुकसान माकडांकडून होत आहे. यामुळे आर्थिक नुकसानीसह शेतकऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

वन विभागाच्या माध्यमातून अलीकडेच माकड पकड मोहीम हाती घेण्यात आली आहे. उपद्रवी माकडांना वनविभागाच्या अधिकृत टीमकडून जेरबंद करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले जात आहे. अशाच प्रकारची मोहीम सोनुर्ली गावामध्ये तात्काळ राबविण्यात यावी व उपद्रवी लाल तोंडाच्या माकडांना जेरबंद करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी गावकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.