खेडमधील ६३ प्राथ. शाळांची होणार दुरुस्ती

निधीअभावी कामात पडला होता खोडा; उर्वरित वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे घोडे अडलेलेच, पालकांना धास्ती
खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील नादुरुस्त स्थितीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव शासनदरबारी पाठवूनदेखील निधीअभावी दुरुस्तीच्या कामात खोडा पडला होता. जिल्हा नियोजनमधून ६३ शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाल्याने पालकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. या शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला असला तरी उर्वरित वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे घोडे अडलेले असल्याने पालकांची धास्ती मात्र कायम आहे.
तालुक्यातील प्राथमिक शाळांच्या इमारतीची स्थिती बिकट आहे. अशा धोकादायक स्थितीतील शाळांमध्ये पाल्यांना पाठवायचे कसे, अशी चिंता पालकांना वर्षानुवर्षे सतावत होती. यामुळे काही पालकानी प्राथमिक शाळाऐवजी शहरातील शाळांमध्येच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठवणे पसंत केले आहे. यामुळे प्राथमिक शाळांमधील पटसंख्या कमालीची घटली असून त्याचा परिणाम शाळा बंद करण्यात झाला आहे. बहुतांश शाळांना विद्यार्थ्याअभावी कुलूप ठोकण्यात आले आहे. गतवर्षी तालुक्यातील शिरवली प्राथमिक शाळेच्या दोन वर्गखोल्यांचे छत कोसळले होते. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर पडलेल्या प्रकारामुळे मोठी दुर्घटना टळली होती. या पाठोपाठच पुरे येथेही इमारतीचा पायाच खचला होता. या दोन शाळांपाठोपाठ अन्य नादुरुस्त स्थितीतील शाळांच्या इमारती व वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव शासन दरबारी पाठवण्यात आले होते. मात्र, शाळा व्यवस्थापन समितीसह ग्रामपंचायत तसेच पालकांकडून शिक्षण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करूनदेखील पदरी निराशाच पडली होती.
येथील शिक्षण विभागानेही शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याकरिता सातत्याने पाठपुरावा करूनही अपयशच आते होते.  नादुरुरत शाळांच्या दुरुस्तीप्रश्नी दस्तुरखुद्द पालकमंत्री उदय सामंत यांनी गांभिर्याने लक्ष घालत २०२४- २५ च्या जिल्हा नियोजनमधून दुरुस्तीसाठी।साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून तालुक्यातील ६३ शाळांची दुरुस्ती करण्यात येणार असून यासाठी ४ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. यामुळे येथील शिक्षण विभागासह पालकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
 तालुक्यातील देवघर – निवाचीवाडी, घेरारसाळगड क्र. १ पेठकिल्ला, जैतापूर- कावणकरवाडी क्र. १ पोमनार पाटीलवाडी, बौद्धवाडी, धामणी क्र. १, पलित्रा, घेरापालगड क्र. १, हेदली-सवेणी धामणी विद्यामंदिर, माणी क्र. १. शिंदेवाडी, सवेणी – लिंगायत, उर्दू ऐनवरे, हेदली-चिनकटेवाडी, क्र. १. कुळवडी तांबरी, केंद्रीय शाळा मिलें, खोपी लाडवाडी, धनगरवाडी, शिरगाव क्र. १. शिंदेवाडी, वेधेवाडी, खोपी रामजीवाडी, कुंमाड क्र. १. नातूनगर क्र. १ या नादुरुस्त शाळांचा समावेश आहे.
या पाठोपाठ वावे, बोरघर, चिंचवली, कसबा नातू आंबये, जामगे, शिवतर, पुरे शिंगरी, दहिवली, घोगरे, मांडवे, बोरज, जांबुर्डे, मोरवडे, निगडे, निळवणे, उपळे, शिरवली, अपेडे, कळवणी, कर्टेल, तुळशी, कशेडी खवटी, भडगाव, भोस्ते, ऐनवली, कुडोशी, मोहाने, दयाळ, फुरूस वेरळ, सुकिवली, बिजघर, चाटव, अस्तान, हुंबरी, सणघर, वरवलीसह अन्य गावातील नादुरुस्त प्राथमिक शाळांचाही समावेश आहे.
येथील शिक्षण विभागाकडून १९४ नादुरुस्त स्थितीतील शाळांमधील वर्गखोल्यांचे प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवले होते. यातील अवघ्या ६२ शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला आहे. उर्वरित शाळांमधील वर्गखोल्या दुरुस्तीचे काय, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. शिक्षण विभागाने ही बाब गांभिर्याने घेवून तालुक्यातील सर्वच नादुरुस्त वर्गखोल्यांच्या दुरुस्तीकरिता निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले आहे.