LANJA: लांजात जल जीवन मिशन योजने अंतर्गत स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजनेची कामे संथगतीने

The work of independent tap water supply scheme under Lanjat Jal Jeevan Mission scheme is slow

काही कामे ही फक्त कागदवारच,तर काही कामांचा फक्त दिखावा

माहिती अधिकार कार्यकर्ते केतन भोज यांच्याकडून पोलखोल

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यात जलजीवन मिशन योजने अंतर्गत स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजनेची कामे संथगतीने सुरू असल्याचे दिसत असून यातील बरीचशी काही कामे ही फक्त कागदवारच पूर्ण झाल्याचे दिसत आहे,त्यामुळे तालुक्यातील टंचाईग्रस्त कोचरी सारख्या अशा अनेक भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून आजही त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. याला सर्वस्वी स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी वर्गाची उदासिनता याला कारणीभूत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते केतन भोज यांनी सांगितले.

जलजीवन मिशन योजने अंतर्गत स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना रत्नागिरी जिल्ह्यात राबविली जात आहे,जल जीवन मिशन या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना पुरेसे,दर्जेदार व नियमित पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.जिल्हा परिषद रत्नागिरी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ही योजना जिल्ह्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरात पोचवण्याचे लक्ष्य निश्चित केले गेले असले तरी यामध्ये आहे.केतन भोज यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग लांजा यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार जलजीवन कार्यक्रम सन २०२१-२२ दि.०९ मे २०२३ च्या अखेरच्या अहवालाप्रमाणे संपूर्ण लांजा तालुक्यात नळ पाणी पुरवठा योजनेसंदर्भातील एकूण ९३ कामे आहेत.त्यामधील बरीच काम ही संथगतीने सुरू असल्याचे दिसत आहे तर काही २०२१-२२ मधील कामांना निधी मंजूर करून देखील अद्यापही ही कामे सुरू केली गेलेली दिसत नाहीत.फक्त लांजा तालुक्यातील स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजनेवर कोट्यावधी रुपये खर्च केले गेले असल्याचे माहिती अधिकारात उघडकीस आले आहे.तर दुसरीकडे जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग लांजा यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते केतन भोज यांना दिलेल्या माहितीप्रमाणे लांजा तालुक्यातील काही गावात स्वतंत्र नळ पाणी योजनेची कामे पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले मात्र प्रत्यक्ष प्रत्येक घरात स्वतंत्र नळ लावले तरी अद्याप त्या नळातुन पाण्याचा एक थेंब ही येत नसून ते नळ आता शोभेच्या वस्तू झाल्याचे प्रत्यक्षात दिसत असून काही ठिकाणी ते नळच आता मोडकळीस आले आहेत असे चित्र तालुक्यातील काही गावात दिसत आहे मग ही योजना ग्रामस्थांना नसून ठेकेदारांना खुश करण्यासाठी राबविली जात आहे का ? किंवा वरिष्ठ पातळीवर शासनाला नुसता दिखावा म्हणून अहवाल देण्यासाठी व नावापुरीती दाखविण्यासाठी ही योजना तालुक्यातील काही गावात राबविली जात तर नाही ना,असा प्रश्न आता या ठिकाणी नागरिक विचारत आहे.

मुळात या सर्व कामावर वरिष्ठ पातळीवरील संबंधित प्रशासकीय अधिकारी वर्गाचा अंकुश नसल्यामुळेच असे प्रकार होत असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते केतन भोज यांचे म्हणणे आहे.याशिवाय ही योजना काही गावात व्यवस्थितरित्या राबविली न गेल्यामुळे ही योजना कुठे तरी कुचकामी ठरत आहे.कारण यापूर्वी देखील राष्ट्रीय पेयजल योजना,जलस्वराज्य योजना आदी योजनांच्या माध्यमातून गावागावात नळ पाणी योजना राबवल्या गेल्या.मात्र,काही वर्षात त्या तकलादू ठरल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले.यामुळे या नळ पाणी योजना योग्य पध्दतीने होण्यासाठी संबंधित शासन प्रशासनाने देखील तितक्याच जबाबदारीने लक्ष देणे आवश्यक आहे,असे मत माहिती अधिकार कार्यकर्ते केतन भोज यांनी व्यक्त केले.