कुवे गावचे ग्रामदैवत श्री रासा देवीची पालखी भक्तांच्या भेटीला घरोघरी

वर्षातून एकदा घरी येणाऱ्या ग्रामदेवतेच्या पालखी भेटीमुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील कुवे गावचे ग्रामदैवत श्री रासा देवीची पालखी भक्तांच्या भेटीला घरोघरी जाण्यास सुरुवात झाली आहे. वर्षातून एकदा ग्रामदैवत आपल्या घरी येत असल्याने आबालवृद्धांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पालखी दर्शनासाठी तर मुंबईकर चाकरमानी देखील गावी दाखल झाले आहेत.

कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर गावच्या ग्रामदेवतांच्या पालख्या या ग्रामस्थांच्या भेटीला घरोघरी जात असतात. तशाच प्रकारे कुवे गावची ग्रामदेवता श्री रासा देवीच्या पालखीचे ढोल ताशांच्या गजरात घरोघरी आगमन होत आहे .पालखी गावातील घरा-घरात फिरत असल्याने ठिकठिकाणी सडा- रांगोळी घालून देवीच्या पालखीचे स्वागत स्वागत केले जात आहे. वर्षातून एकदा देव भेटायला आपल्या घरी येत असल्याने आबालवृद्धांमध्ये आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.तर देवतेच्या पालखीच्या स्वागतासाठी मुंबईकर चाकरमानी देखिल गावी दाखल झाले आहेत.

घरी येणाऱ्या ग्रामदेवतेच्या पालखीची ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे असे कार्यक्रम सध्या सुरू झाले आहेत. एकूणच ग्रामदेवतेच्या पालखी भेटीमुळे कुवे गावात चैतन्याचे वातावरण

निर्माण झाले आहे.

दरम्यान, उद्या मंगळवारी २५ मार्च रोजी पालखीने खुणा काढण्याचा कार्यक्रम होणार आहे.