भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह

मार्जिन मनी योजनेची जनजागृती कार्यशाळा संपन्न

रत्नागिरी :- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यभरात “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजनेची जनजागृती कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजनेची माहिती वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक विजया मोरे यांनी दिली.
कार्यशाळेमध्ये सदर योजनेअंतर्गत अनु. जाती व नवबौध्द संवर्गातील होतकरू नवउद्योजकास स्टँडअप योजनेअंतर्गत प्रकल्प मंजुरीसाठी मार्जिन मनी उपलब्ध होवून त्यास आर्थिक मदत करून त्यास सक्षम बनविण्याचा शासनाचा मुख्य उद्देश आहे. स्टँडअप योजनेतंर्गत बँकेने ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर व अनुसूचित जातीच्या नवउद्योजकाने १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर १५ टक्के हिस्सा राज्य शासनामार्फत देण्यात येतो. या कार्यशाळेत महामंडळांमार्फत विविध व्यवसायांकरिता कर्ज सुविधांबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेस गृहपाल दीपक जाधव, विनोद देसाई, रविंद्र कुमठेकर, जिल्हा व्यवस्थापक शामराव पेजे महामंडळ प्रिती पटेल, कार्यालयीन सहाय्यक महात्मा फुले विकास महामंडळ श्रध्दा यादव, दिव्यांग महामंडळांच्या रोशनी सावंत, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार निकास महामंडळाच्या सुप्रिया पवार, वसंतराव नाईक महामंडळाच्या श्रीमती खेडकर, समतादूत आशिष कांबळे, रुपाई बाईत, प्राजक्ता मराठे आदी उपस्थित होते. कार्यशाळेस मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी सहभाग नोंदविला.