फोटोचा अल्बम लवकरच जनतेसमोर येणार ; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा सूचक इशारा
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्ती विरोधात पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांनी आक्रमक भुमिका घेतली आहेत. अनेक गुन्हेगार प्रवृत्ती गजाआड झाले आहेत. पोलीस प्रशासनही गतिमान झाले असून अनेक गुन्ह्यांची उकल होत आहे. कुडाळ तालुक्यातील एका खून प्रकरणात उबाठाचा तत्कालीन कार्यकर्ता व वैभव नाईक यांचा साथीदार सिद्धेश शिरसाट गजाआड झाला आहे. त्यामुळे नाईकच्या पायाखालची जामीन सरकली असून त्यावेळी दोन वर्षे हे प्रकरण दाबून ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वैभव नाईकनी आपले नाव समोर येण्यापूर्वी या शिरसाठचे सत्ताधाऱ्यांसोबत व्हायरल केले. मात्र खोटारड्या वैभव नाईक यांना हे भान अजिबात राहिले नाही, की या शिरसाठ सोबतचे त्यांचे अनेक फोटो आमच्याकडे सोशल मीडियात उपलब्ध आहेत. या फोटोचा अल्बम आम्ही लवकरच खुला करू. सोबतच या संपूर्ण प्रकरणात कोण आका आहे हेही पुराव्यासह जनतेसमोर येईल. असा सूचक इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी वैभव नाईकांना दिला आहे.
सिद्धीविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणातील आरोपी सिद्धेश शिरसाट हा दोन वर्षापूर्वी ठाकरे गटातच होता. तरीही माजी आमदार वैभव नाईक या प्रकरणातील आका कोण असे विचारत बीड जिल्ह्यासोबत तुलना करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची नाहक बदनामी करत आहेत. खरेतर वैभव नाईक यांचाच गुन्हेगारांना आशीर्वाद राहिला. त्यामुळे या प्रकरणातील आका कोण हे उघड होईल. असा इशाराही दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिला.
दत्ता सामंत यांनी मालवण कुंभारमाठ येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, भाऊ मोर्जे आदी व इतर उपस्थित होते.
सिद्धेश शिरसाट हा वैभव नाईक यांच्याच ठाकरे गटात होता. त्याचे व्यवसाय नाईक यांच्याच आशीर्वादाने सुरु होते. त्यामुळे नाईक यांच्या बोंबा या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. घटना कधीची आणि त्यावेळी आरोपी कुठे होता हे नाईक यांनी स्पष्ट करावे. नाहक कोणाचे नाव घेऊन बदनामी करण्याचे षडयंत्र नाईक यांचे आहे. निवडणुकीत पडलेल्या व जनतेने नाकारलेल्या माजी आमदाराने बेताल बोलू नये. उगाच बोंबा मारून शांतप्रिय सिंधुदुर्ग जिल्ह्याची तुलना बीड जिल्ह्याशी करू नये, असा इशारा दत्ता सामंत यांनी यावेळी दिला.
आमदार झाल्यापासून निलेश राणे चांगले काम करत आहेत. त्यांच्या कामाचे जनतेतून कौतुक होत आहे. त्यामुळे विरोधक अस्थिर झाले असून अस्तित्व शोधत आहेत. टिका टिप्पणीचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे सामंत म्हणले.











