सावंतवाडी भवानी चौकात दुचाकींच्या पार्किंगमुळे वाहतुकीचा बोजवारा

सावंतवाडी । प्रतिनिधी : शहरातील मध्यवर्ती असलेल्या भवानी चौक आणि मच्छी मार्केट तिठ्यावर दुचाकी गाड्यांच्या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत या मुख्य रस्त्यावर तासन् तास दुचाकी उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे.
रस्त्याच्या एका बाजूला अधिकृत रिक्षा स्टॅन्ड आहे, तर दुसऱ्या बाजूला अनधिकृतपणे दुचाकींची लांबलचक रांग लागलेली असते. यामुळे समोरासमोरून येणाऱ्या चारचाकी गाड्यांना मार्ग काढणे अत्यंत कठीण झाले असून या भागात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. या परिस्थितीत पादचाऱ्यांसाठी चालणेही मुश्कील झाले आहे.

 

या अनधिकृत पार्किंगमुळे व्यापारी वर्गालाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुकानांसमोर दुचाकी उभ्या केल्याने ग्राहकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे.
सावंतवाडी शहरात दिवसेंदिवस वाढणारी गर्दी लक्षात घेता, नागरिक आणि व्यापारी वर्गातून सावंतवाडी नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला तातडीने या समस्येवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
या भागातील अनधिकृत पार्किंग हटवून वाहतूक सुरळीत करावी तसेच स्थानिक व्यापाऱ्यांना योग्य ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करून द्यावी,
अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली आहे.