कोत्रेवाडी ग्रामस्थांची माजी आमदार राजन साळवी यांच्याकडे मागणी
लांजा (प्रतिनिधी) कोत्रेवाडी डम्पिंग ग्राउंड प्रकल्पात तुमचा सुताराम संबंध नसेल, तुमचे हात बरबटलेले नसतील तर पक्षाचे प्रमुख, विद्यमान उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राउंड प्रकल्प रद्द करा,अशी मागणी कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राउंड प्रकल्पाशी माझा सुतारामही संबंध नाही, असा खुलासा माजी आमदार राजन साळवी यांनी केला आहे. तसेच लोकांचा विरोध असलेल्या डम्पिंग ग्राउंड प्रकरणात मी कोत्रेवाडीतील लोकांसोबत आजही आहे आणि कायम राहणार असेही आज लांजा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.
या पार्श्वभूमीवर कोत्रेवाडी येथील ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आमदार राजन साळवी यांनी डम्पिंग ग्राउंड विरोधात असलेल्या ग्रामस्थांसोबत राहण्याच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. मात्र केवळ आमच्या सोबत न राहता हा डम्पिंग ग्राउंड प्रकल्प रद्द करा अशी आमची मागणी आहे. तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सद्यस्थितीत नगरविकास मंत्री पद असून त्याच खात्याच्या अखत्यारीत नगर पंचायतीचा कारभार चालतो. त्यामुळे नगरविकास मंत्री पद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने आणि राजन साळवी आपण त्यांच्याशी अत्यंत जवळचे असल्याने एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोत्रेवाडी डम्पिंग ग्राउंड प्रकल्प रद्द करा आणि आपण खरोखरच जनतेचे कैवारी आहात, या कोत्रेवाडी लोकांसोबत आहात हे आपल्या प्रत्यक्ष कृतीतून दाखवून द्या अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.











