महिलेच्या पर्समधून सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम लांबविली

लांजा बसस्थानकातील प्रकार, अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल

लांजा (प्रतिनिधी) महिलेच्या पर्स मधून सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम असा ८२ हजार ६४३ रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना लांजा बस स्थानकात घडली आहे. दिनांक १७ मे रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्यान घडलेल्या या घटने प्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतची तक्रार सौ. स्मिता गणपत बापेरकर (वय ५४, सध्या राहणार घाटकोपर मुंबई, मुळगाव खडी कोळवण, ता.राजापूर) यांनी लांजा पोलीस ठाण्यात केली आहे. अस्मिता बापेरकर या दिनांक १७ मे रोजी दुपारी लांजा झर्ये एसटी गाडीने आपल्या व्हेळ गावी चालल्या होत्या. दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्याने त्या लांजा बस स्टँड येथे एसटी बस मध्ये चढत असताना त्यांनी खांद्याला अडकवलेल्या हॅन्डबॅग पर्स मधील पाकीटात ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र ज्याची किंमत ७७ हजार ७४३ रुपये तसेच रोख रक्कम ४९०० असा एकूण ८२ हजार ६४३ रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लांबविला.

याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगळे हे करत आहेत.