मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांची मागणी
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याची मागणी मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केली आहे. पालकमंत्री नीतेश राणे यांनी या मागणीचा पाठपुरावा करावा, असे आवाहन केसरकर यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडून वीज खांब वाकले आहेत, त्यामुळे अनेक गावे अंधारात आहेत. शहरी भागातही दिवसभर वीज गायब असल्याने व्यापारी, दुकानदार आणि उद्योजकांचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच विद्युत यंत्रणेचेही मोठे नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार वारंवार घडत असून, वीज कंपनीच्या कार्यालयांकडून माहिती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे, असे ॲड. केसरकर यांनी नमूद केले.
सिंधुदुर्ग जिल्हा हा पूर्णपणे डोंगराळ भाग आहे. अनेक विद्युत यंत्रणा आणि तारा जंगलमय भागातून टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे झाडे पडून तारा तुटणे, तसेच विद्युत प्रवाह चालू असलेल्या तारा जमिनीवर पडून आग लागणे, यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणे आणि पाळीव जनावरे दगावण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. हे वारंवार होणारे नुकसान टाळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला विशेष बाब म्हणून संपूर्ण जिल्ह्यात भूमिगत वीज तारा टाकून त्यामार्फत विद्युत पुरवठा करण्यासाठी पालकमंत्री नीतेश राणे यांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केली आहे.










