गावागावांमध्ये उभारणार चळवळ, स्थानिकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न
गुहागर प्रतिनिधी –
ग्रामीण भागात स्थानिक स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट व वैयक्तिक विक्री करणारे लहान-मोठे व्यवसायिक यांच्या मालाचे उत्पादन स्थानिक बाजारपेठांमध्येच विकले जावे व स्थानिकांना यातून रोजगार मिळून गावांमधील स्थलांतर रोखता येईल, या ध्येयाने प्रेरित होऊन गुहागर तालुक्यातील अँड. सुशील अवेरे या तरुणाने वकिलाने गावागावांमध्ये फिरुन चळवळ उभारण्याचा मानस व्यक्त केला असून हा उपक्रम गणेशोत्सवापूर्वी सुरु करण्यात येणार आहे.
याबाबत अँड. अवेरे यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “स्वदेशी” भावना आणि “लोकलसाठी आवाज” मोहिमेवर वारंवार भर दिल्याचे अलिकडील अहवालांमधून दिसून येत आहे. ज्यामध्ये भारतीयांना स्थानिक पातळीवर बनवलेल्या उत्पादनांना प्राधान्य देण्याचे आणि त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले जाते. वाढत्या जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि अलिकडच्या आंतरराष्ट्रीय व्यापार घडामोडींच्या पार्श्वभूमीवर स्वदेशीकरणासाठी हा आग्रह आला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या तालुका, गाव पातळीवरुन यासाठी चळवळ उभी केलास गावांमध्ये मोठी आर्थिक सुबत्ता निर्माण होऊन स्थलातंर रोखता येईल, असा विचार व्यक्त करुन स्वतःपासून त्यांनी सुरुवात केल्याचे सांगितले.
आपली दैनंदिन खरेदी प्रथम आपल्या गावामधून सुरु करण्यासाठी प्रारंभी ते गावांमध्ये जनजागृती करणार आहेत. आपल्याला स्थानिक पातळीवर आवश्यक वस्तू न मिळाल्यास आपल्या शेजारील गाव, शहर, मध्यवर्ती शहर, तालुका येथे जाऊन त्यांची खरेदी करता येईल. विशेष करुन गणेशोत्सवासाठी गावाला येणाऱ्या चाकरमान्यांनी आपली खरेदी आपल्या गावात किंवा स्थानिक बाजारपेठांमध्ये केली तर उत्पादक सामाजिक संस्था, बचतगट यांना मोठया प्रमाणात रोजगार मिळेल पर्यायाने आपले गाव, राज्य -देशाची अर्थव्यवस्था मजबूत राहील व आपले गावाकडून शहरांकडे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबविता येईल, हा यामागे उद्देश असल्याचे अँड. अवेरे यांनी सांगितले.









