वेंगुर्ले येथे शिवसेनेतर्फे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न..
वेंगुर्ले : प्रतिनिधी
ध्येय ठेवून विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केल्यास यश दूर नाही. शिक्षण घेत असताना कोणतीही अडचण असल्यास विद्यार्थ्यांनी सांगावे. शिवसेना पक्षाच्या वतीने त्या अडचणी दूर करून योग्य मार्ग दाखविण्याचा आम्ही प्रयत्न करू असे प्रतिपादन माजी शालेय शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले आहे.
वेंगुर्ले कॅम्प येथील बॅरिस्टर नाथ पै समुदाय केंद्र येथे शिवसेनेतर्फे आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील सन २०२५ मधील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला होता. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार केसरकर बोलत होते. त्यांच्यासोबत व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, उपजिल्हा प्रमुख सचिन देसाई, माजी शालेय शिक्षण सभापती दादा कुबल, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, तालुकाप्रमुख स्वप्निल गावडे, सुहास कोळसुलकर, योगेश तेली, ॲड. श्रध्दा बाविस्कर, परीक्षित मांजरेकर, शबाना शेख आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाप्रमुख संजू परब यांनी बोलताना सांगितले की, मुलांनो आपल्या आई वडिलांना विसरू नका. त्यांचे ऋण मोठे आहे हे लक्षात ठेवा. तसेच वाचनाने माणूस मोठा होतो.
जो वाचत नाही तो मोठा होऊ शकत नाही. आणि महत्वाचे आयुष्यात व्यसन कधी करू नका असा सल्ला त्यांनी दिला. तर जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी बोलताना मुलांना कष्टाचे महत्त्व पटवून दिले. जो कष्टाने आणि जिद्दीने काम करतो तो कधीही अपयशी होत नाही हे लक्षात ठेवा. झटपट श्रीमंत होता येत नाही. गरिबी दूर करून श्रीमंत होण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आणि चिकाटी महत्त्वाची आहे असे त्यांनी सांगितले. तसेच व्यसनांप्रमाणे मोबाईल पासूनही दूर राहा. आवश्यक तेथेच मोबाईलचा वापर करा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सचिन देसाई, दादा कुबल, उमेश येरम यांनी ही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी करताना शिवसेनेच्या या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. या कार्यक्रमात तालुक्यातील दहावी बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यालयातील प्रथम तीन विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा. सचिन परुळकर यांनी मानले.









