मराठी शाळा टिकवणे काळाची गरज: चंद्रकांत तायशेटे

कारिवडे कट्टा शाळेला मौल्यवान भूखंड दान

सावंतवाडी । प्रतिनिधी : मराठी शाळा टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे, असे मत व्यक्त करत जि. प. पु. प्रा. शाळा कारिवडे कट्टा येथील माजी विद्यार्थी श्री. चंद्रकांत अनंत तायशेटे यांनी शाळेला मौल्यवान जमीन दान केली आहे. त्याचबरोबर, भविष्यात शाळेला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

शाळेत मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५ रोजी शारदोत्सव व माजी विद्यार्थी स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले. यावेळी श्री. तायशेटे यांच्या या बहुमूल्य योगदानाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती आणि गावठणवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना श्री. तायशेटे म्हणाले की, “पूर्वीच्या लोकांनी आपणास घडविण्यासाठी अतिशय कष्टाने या शाळा सुरू केल्या. त्या अशाच चालू ठेवणे ही काळाची गरज आहे. मी याच शाळेत शिकून मोठा झालो, त्यामुळे या शाळेचे आणि इथल्या ग्रामस्थांचे ऋण मी कधीही विसरणार नाही.” यापुढेही शाळेला लागणारी सर्व मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, त्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही केले.

कार्यक्रमात केंद्र प्रमुख वालावलकर, व सरपंच सौ. आरती अशोक माळकर यांचाही सन्मान श्री. बाबा गावकर यांच्या हस्ते करण्यात आला. श्री. अशोक माळकर यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील मराठी शाळा टिकून राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शाळेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा आणि ग्रामस्थांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

व्यासपीठावर उपस्थित मान्यवर:

व्यासपीठावर देवस्थानचे प्रमुख मानकरी श्री. बाबा गावकर, सरपंच सौ. आरती माळकर, मुख्याध्यापिका तावडे, श्री. चंद्रकांत तायशेटे, श्री. अशोक माळकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. रवींद्र कारिवाडेकर, श्री. शंकर मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य सौ. भाग्यश्री भारमाल, श्री. भाई पोकळे, श्री. आपा भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. रात्री श्री. माऊली दशावतार नाट्य मंडळ इन्सुली यांचा दणदणीत नाट्यप्रयोग संपन्न झाला, ज्याला कारिवडे ग्रामस्थांनी आणि नाट्यरसिकांनी भरभरून दाद दिली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व गावठणवाडी ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका तावडे व राऊळ आणि विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेतली.