पोलिस विद्यार्थ्यांकडून आभार प्रदर्शन
खेड (प्रतिनिधी)
राज्यातील हजारो पोलिस कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या संधीसाठी दीर्घकाळ प्रलंबित असलेला मुद्दा अखेर मार्गी लागला आहे. पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या विभागीय परीक्षेबाबतचा निर्णय शासनाने घेतला असून, या निर्णयामुळे अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना अधिकारी होण्याची संधी पुन्हा मिळाली आहे.
या महत्त्वाच्या निर्णयामागे मा. गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि संवेदनशील भूमिका मोठ्या प्रमाणात दिसून आली. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी संबंधित पोलिस शिपायांच्या प्रतिनिधीमंडळाने श्री. कदम यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली होती. त्या भेटीनंतर कदम साहेबांनी स्वतः या प्रकरणाचा पाठपुरावा करत प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केले आणि विभागीय परीक्षा सुरू ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू ठेवले.
अखेर त्यांच्या या अथक प्रयत्नांना यश मिळाले आणि १ सप्टेंबर २०२५ रोजी पोलीस उपनिरीक्षक पदाची विभागीय परीक्षा पूर्वीप्रमाणे सुरू ठेवण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. या निर्णयामुळे राज्यभरातील पोलिस विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिस विद्यार्थ्यांनी आज मुंबईत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन मनःपूर्वक आभार मानले. यावेळी विद्यार्थ्यांनी काही पुढील प्रश्नही मंत्री महोदयांसमोर मांडले.
या वेळी श्री. कदम म्हणाले, पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा सुरू राहावी यासाठी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून सर्व गोष्टी मार्गी लावल्या आहेत. यावरून पोलिस दलाविषयी त्यांची आत्मीयता आणि बांधिलकी दिसून येते.
ते पुढे म्हणाले, या परीक्षेशी संबंधित सर्व अडचणी सोडवण्यासाठी शासन पूर्णपणे सकारात्मक आहे. विद्यार्थ्यांनी कोणतीही काळजी करू नये. मन लावून अभ्यास करा, सक्षम आणि जबाबदार अधिकारी बना.
या निर्णयामुळे राज्यातील पोलिस विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीपूर्वीच आनंद फुलला आहे. अनेक जणांनी आपल्या भावनाही व्यक्त करत म्हटले की, “गेल्या काही महिन्यांपासून आमच्या करिअरबाबत निर्माण झालेली अनिश्चितता संपली आहे. मा. मंत्री श्री. योगेश कदम आणि शासनाचे आम्ही मनापासून आभारी आहोत.”
राज्यभरातून पोलिस विभागातील तरुणांमध्ये या निर्णयाबद्दल समाधान आणि उत्साह व्यक्त होत असून, त्यांच्या अधिकारी होण्याच्या स्वप्नाला नवी दिशा मिळाली आहे.











