रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरानजीकच्या भाटये येथील रत्नसागर रिसॉर्टप्रकरणी जप्तीसाठी जिल्हा न्यायालयाकडून २९ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मिळाली होती. संबंधित रिसॉर्ट मुदतीआधीच जिल्हा प्रशासनाकडून बंद करण्यात आल्याने झालेले नुकसान भरपाई जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावी अथवा त्यांची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाकडून देण्यात आले होते; मात्र जिल्हा प्रशासनाने तत्काळ स्थगिती मिळवली. आता ही स्थगितीची सुनावणी बुधवारी (ता. २९) जिल्हा न्यायालयात झाली. न्यायालयाने पुन्हा १२ नोव्हेंबरपर्यंत स्थगिती मुदतवाढ दिली आहे.
भाट्ये समुद्रकिनाऱ्यावरील रत्नसागर रिसॉर्ट मे २०२१ मध्ये जिल्हा प्रशासनाकडून बंद करण्यात आले होते. मुदतीआधीच रिसॉर्ट बंद केल्याने संबंधित मालक प्रतापसिंह सावंत यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. अचानक रिसॉर्ट बंद झाल्याने सावंत यांची ९ कोटी २५ लाख रुपयेइतकी नुकसान भरपाई जिल्हा प्रशासनाने द्यावी, असे आदेश जिल्हा न्यायालयाकडून देण्यात आल्याचे सावंत यांनी सांगितले होते. ४ एप्रिलला संबंधित प्रकरणाचे आदेश घेऊन कोर्टाचे २ कर्मचारी व तक्रारदार सावंत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. या आदेशासंदर्भात जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आली होती, असेही या वेळी सावंत यांनी सांगितले होते.
न्यायालयाच्या आदेशानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानभरपाई द्यावी अन्यथा त्यांच्या कार्यालयातील सामान जप्त करण्याच्या आदेशानुसार कारवाईला सुरवात केली. या कारवाईत जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातील खुर्च्या आणि संगणक बाहेर काढले. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई कऱण्यात आली होती; मात्र संबंधित कारवाईसंदर्भात तत्काळ स्थगिती मिळवण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले. या संदर्भात पुन्हा बुधवारी (ता. २९) जिल्हा न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. जिल्हा न्यायालयाकडून आता १२ नोव्हेंबरपर्यंत स्थगितीला मुदतवाढ देण्यात आली आहे.











