लांजा तालुक्यातील तळवडे येथील घटना
लांजा| संतोष कोत्रे : सर्वसाधारणपणे मृत्यूसारखी घटना घडल्यास आई-वडिलांच्या चितेला अग्नी व अंत्यविधीसारखे सर्व विधी मुलगा पार पाडतो. मात्र तालुक्यातील तळवडे गावातील आंबेकर वाडीतील वयोवृद्ध यमुना तानू आंबेकर हिचे वृद्धापकाळाने निधन झाल्यावर मुलगा नसल्याने मुलीने पुढाकार घेत आईचे अंत्यविधी पार पाडून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.
यमुना आंबेकर यांना मुलगा नसून चार मुली आहेत. त्यांना हिरा, तारा, सरिता आणि नकुशा अशा चार मुली आहेत. मुलगा नसल्याने त्यांच्या वृद्धापकाळी त्यांची सेवा मुलीच करत होत्या. मुलींच्या लहानपणीच यमुनाबाई यांच्या पतीचे निधन झाल्याने आईनेच काबाडकष्ट मोलमजूरी करून मुलींना मोठे केले. त्यांची लग्न करून दिली. म्हणूनच आईच्या या कष्टाने उभ्या केलेल्या संसाराची जाण या सर्वच मुलींना होती. वडील अकाली गेल्याने आईनेच पित्याचे छत्र देवून या मुलींना सांभाळले. म्हणूनच वृद्धापकाळी मुली आईला चांगल्या प्रकारे सांभाळत होत्या. विषेशतः मोठी मुलगी हिरा आईला खुप चांगली सांभाळत होती. तिची काळजी घेत होती.
वृद्धापकाळाने यमुना बाईंची तब्येत बिघडल्याने त्यांना तळवडे येथे घरी आणण्यात आले होते. गुरुवारी १३ जुलै रोजी सकाळी यमुना बाईंना देवाज्ञा झाली. अंत्यविधीसाठी मोठी मुलगी हिरा हिला विचारले असता तिने त्वरीत होकार दिला. वाडी, गावातील वयोवृद्ध, जाणकार यांच्या सल्ल्यानुसार धन पेरणे व अग्नि देणे आदी सर्व अंत्यविधी संस्कार व सोपस्कार पार पाडले. अंत्ययात्रेसाठी गावातील भाऊबंद, वाडकरी, गावकरी आप्तेष्ट मोठ्या संखेने उपस्थित होते. पुरोगामी विचारांच्या या हिरा कन्येचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.












