७ फेब्रुवारीला होणार मतदान
मुंबई: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या शासकीय दुखवट्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार, २८ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत राज्य स्तरावर दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात उमेदवारांना प्रचार करणे शक्य होणार नसल्याने मतदान आणि मतमोजणीचे टप्पे निश्चित केलेल्या दिनांकास पार पाडणे शक्य नव्हते. त्यामुळे निवडणूक आयोगाने नियमानुसार उर्वरित टप्प्यांचा कार्यक्रम नव्याने दिला आहे.
असा आहे सुधारित निवडणूक कार्यक्रम:
जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ जानेवारी २०२६ रोजी या सुधारित कार्यक्रमाची सूचना प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांचा सुधारित निवडणूक कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे:
सुधारित निवडणूक वेळापत्रक २०२६
-
सुधारित कार्यक्रमाची सूचना प्रसिद्ध करणे: ३१ जानेवारी २०२६ (शनिवार).
-
मतदानाची तारीख: ०७ फेब्रुवारी २०२६ (शनिवार).
-
मतदानाची वेळ: सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत.
-
मतमोजणीची तारीख: ०९ फेब्रुवारी २०२६ (सोमवार).
-
मतमोजणीची वेळ: सकाळी १०:०० वाजल्यापासून.
-
निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे: ११ फेब्रुवारी २०२६ (बुधवार) पर्यंत.
या जिल्ह्यांमध्ये होणार निवडणुका
या कार्यक्रमाचा परिणाम रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव आणि लातूर या १२ जिल्ह्यांवर होणार आहे.
निवडणुकीची आचारसंहिता सध्या लागू असून निकाल जाहीर होईपर्यंत ती अंमलात राहील, असे आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.











