व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा ठप्प हॉटेल, बेकरी व अन्य व्यावसायिकांना फटका
राजापूर | प्रतिनिधी : पश्चिम आशियातील वाढत्या युध्द तणावाचे परिणाम आता राजापूर शहर व ग्रामीण भागाला देखील जाणवू लागले आहेत. राजापूर तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीपणे सुरू आहे. तशी माहिती तहसीलदार विकास गंबरे यांनी दिली आहे.
मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्याने व्यावसायिक गॅस पुरवठा ठप्प झाला आहे. याचा फटका हॉटेल व्यावसायिकांसह बेकरी उद्योगाला बसला असून अनेक हॉटेल व्यावसायिकांनी व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी चुलीचा आधार घेतला आहे.
राजापूर तालुक्यात एकूण सुमारे ३९ हजार घरगुती गॅस धारक आहेत, तर १८६ व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे. तालुक्यात एकूण तीन गॅस एजन्सीमधून ग्राहकांना गॅस पुरवठा केला जातो. यामध्ये राजापुरातील श्री राम गॅस एजन्सी, पाचल येथील शांता नंदी व नाटे येथील नाटेश्वर गॅस एजन्सीचा समावेश आहे. यामध्ये राजापुरातील श्री राम गॅस एजन्सीकडे सर्वाधिक २८ हजार घरगुती व १२६ व्यावसायिक ग्राहक आहेत, पाचल येथे ७५०० घरगुती तर ५० व्यावसायिक तर नाटे येथे ३५० घरगुती व १० व्यावसायिक ग्राहक आहेत.
राजापुरात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा आजपर्यंत सुरळीत सुरू आहे. मात्र तणावाची परिस्थिती व ग्राहकांमध्ये काहीशी निर्माण झालेली भिती यामुळे गॅस सिलेंडर बुक करण्याचे प्रमाण वाढले आहे. राजापूर एजन्सीकडे सोमवार अखेर ३ हजार र८९५ ग्राहकांनी ऑनलाईन बुकिंग केले आहे. पर पाचल ५० व नाटे १७६ ग्राहकांनी बुकींग केले आहे.
दर आठवडयाला घरगुती गॅस सिलेंडरचे लोड राजापुरात येत असून बुकिंग प्रमाणे वितरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र काही ठिकाणी वितरण उशीर् होत आहे, मात्र कोणतीही अडचण नसल्याचे तहसीलदार गंबरे यांनी सांगितले.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठाच होत नसल्याने त्याचे वितरण पुर्णपणे ठप्प असल्याचे गंबरे यांनी सांगितले. याचा फटका व्यावसायिकांना बसत असल्याचे दिसून येत आहे. काही हॉटेल व्यावसायिकांनी चुलीचा वापर सुरू केला आहे. मात्र पुढील काही दिवसांत व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर हॉटेल व बेकरी व्यवसायासह वेल्डींग व अन्य व्यवसायांना फटका बसण्याची शक्यता आहे.
घरगुती गॅस सिलेंडर धारकांना सुरळीत गॅस पुरवठा करण्याच्या सुचना एजन्सींना देण्यात आलेल्या असून प्रशासनाचे याकडे बारकाईने लक्ष असल्याचे गंबरे यांनी सांगितले. ग्राहकांनीही गर्दी करू नये वा अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहनही गंबरे यांनी केले आहे.












