देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख, संगमेश्वर, साखरपा परिसरात गुरूवारी दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासून असलेल्या प्रचंड उकाड्यानंतर दुपारच्या सत्रात पावसाचे आगमन झाले.या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असला तरी आंबा आणि काजू पिकाला मात्र या पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गुरूवारी सकाळपासूनच तालुक्यात उन्हाचा तडाखा जाणवत होता. वातावरणात कमालीचा उष्मा असल्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र
दुपारी अचानक हवामानात बदल झाला आणि आकाशात काळे ढग जमा होण्यास सुरुवात झाली. पावसाच्या पहिल्या सरी कोसळताच मातीचा मृदगंध सर्वत्र दरवळला, ज्यामुळे काही काळ मानला प्रसन्न करणारे वातावरण निर्माण झाले. पावसामुळे वातावरणात थंडावा आला असला, तरी शेतकरी मात्र चिंतेत पडला आहे. आंबा आणि काजूच्या हंगामाला सुरवात असताना या अवकाळी पावसामुळे फळांवर डाग पडणे, कीड लागणे किंवा फळगळ होण्याचा धोका वाढला आहे. हातातोंडाशी आलेले उत्पन्न या पावसामुळे वाया जाईल की काय? अशी भीती बागायतदारांना सतावत आहे.










