देवगडात आमदार चषक 2026 स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले कौतुक

देवगड : यंग स्टार आयोजित आमदार चषक 2026 क्रिकेट स्पर्धेला यंदाही प्रचंड प्रतिसाद मिळत असून, उशिरा रात्रीपर्यंत सुरू असलेल्या सामन्यांना प्रेक्षकांची मोठी उपस्थिती लाभली. या स्पर्धेच्या निमित्ताने सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी उपस्थित राहून आयोजकांचे आणि खेळाडूंचे मनापासून कौतुक केले.

 

मंचावर उपस्थित मान्यवर, आयोजक बुवा तारी, संतोष तारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करताना पालकमंत्री ना. नितेश राणे म्हणाले की, आमदार चषक या नावाला साजेसा दर्जा या स्पर्धेत पाहायला मिळतो. उशिरा रात्रीपर्यंत प्रेक्षक मोठ्या संख्येने मैदानावर उपस्थित राहतात, हेच या स्पर्धेचे यश असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

ते पुढे म्हणाले की, या स्पर्धेमुळे देवगडसह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून क्रिकेटप्रेमी एकत्र येतात आणि एक उत्साहपूर्ण वातावरण निर्माण होते. देशातील विविध राज्यांमधून खेळाडूंना सहभागी करून घेत उच्च दर्जाची स्पर्धा उभी करण्याचे काम आयोजकांनी केले आहे, याबद्दल त्यांनी विशेष कौतुक व्यक्त केले.

 

YouTubeवरही या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत 18 लाखांहून अधिक प्रेक्षकांनी सामने पाहिल्याचे त्यांनी सांगितले. आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धा सुरू असतानाही आमदार चषकाला मिळणारी ही गर्दी आणि प्रतिसाद हा कोकणातील क्रिकेटप्रेमींचा उत्साह दर्शवतो, असेही त्यांनी नमूद केले.

 

आमदार चषक ही केवळ स्पर्धा नसून कोकणातील क्रिकेटची ओळख बनत चालली असून, युवा खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देणारा हा उपक्रम असल्याचेही पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सांगितले.

 

यावेळी बाळ खडपे, संदीप साटम, आयोजक बुवा तारी, संतोष तारी व अन्य उपस्थित होते