संतोष कोत्रे
लांजा-: गोरगरीब जनतेसाठी शासन अनेक योजना राबवत असते. मात्र या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवताना गोरगरीब जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शासन दरबारी हेलपाटे मारावे लागतात, दिवस मोडावा लागतो, पैसे खर्च करावे लागतात. आपल्या मतदारांची, जनतेची हीच हेळसांड आणि गैरसोय लक्षात घेऊन नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या मनीषा गणेश लाखण यांनी सर्व शासकीय योजनांचे कॅम्प गावागावात लावून त्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ गोरगरीब जनतेला मिळवून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे आहे. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे आणि सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक होत आहे.
शासनामार्फत गोरगरीब जनतेसाठी लाडकी बहीण योजना, आधार कार्ड, मतदान कार्ड, आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड, ईश्रम कार्ड, कामगार कल्याण योजना यासारख्या कित्येक शासकीय योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. कारण या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, त्याची नोंदणी कुठे आणि कशी करायची याची माहिती लोकांना नसते. परिणामी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शासन दरबारी अनेक खेटे मारल्यानंतरही त्यांच्या पदरी निराशा येते.
नेमकी हीच बाब लक्षात घेऊन आसगे जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या मनीषा गणेश लाखण यांनी यासाठी आपल्या जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये कॅम्प आयोजित करून त्याद्वारे या शासकीय योजनांचा लाभ ग्रामस्थांना गावातच मिळवून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत आजवर वेरळ, खेरवसे, बेनी, आडवली, शिपोशी, कुरचुंब आदी गावांमध्ये अशा प्रकारचे कॅम्प आयोजित करून त्याद्वारे लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे तालुक्याच्या गावागावातून विशेष कौतुक होत आहे. मनीषा लाखण यांच्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांना गावातच विविध योजनांचा लाभ मिळू लागला आहे. कागदपत्रे मिळवण्यासाठी त्यांची पायपीट थांबली आहे .
विशेष बाब म्हणजे कागदपत्रांसाठी कोणत्या प्रकारची फी देखील घेतली जात नाही पूर्णपणे विनामूल्य कॅम्प भरवला जातो. त्यांच्या या उपक्रमाला गावागावातील गोरगरीब जनतेचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. आसगे येथे आयोजित या कार्यक्रमाला
शिवसेना तालुका संघटक प्रसाद माने, उपतालुका संघटक चेतन खांदारे, विभाग प्रमुख दिनेश पवार ,शिवसेना शाखाप्रमुख राजेंद्र शिंदे, महिला शाखासंघटिका तेजल बाईंग, तंटामुक्ती अध्यक्ष राजन शिंदे,ग्रामसेवक- प्रशासक लोखंडे, तलाठी, कृषी विभाग अधिकारी, हरेश जाधव, तेजस बाईग, ग्रामपंचायत आजी माजी सदस्य,अंगणवाडी सेविका, मदतनीस, गावातील सर्व महिला, ग्रामस्थ,पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
चौकट -गोरगरीब जनतेला शासनाच्या सोयी सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी जि प सदस्य म्हणून मी कटिबद्ध आहे. आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यासाठी मी अहोरात्र मेहनत घेणार आहे







