मानव मुक्तीचा जाहीरनामा म्हणजे संविधान – नूरखा पठाण

चिपळूण रेल्वे स्टेशन येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

संतोष कुळे
चिपळूण : प्रत्येक नागरिकांसाठी संविधान हे केवळ पुस्तक नसून आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. याशिवाय आपण कोणतेही काम करू शकत नाही. संविधान केवळ राज्यपद्धती नव्हे तर जीवनपद्धती आहे. देशाला दिशा देण्याचे काम याच संविधानाच्या माध्यमातून होत आहे. स्वतंत्र्याचा मोकळा श्वास याच संविधानामुळे आपण सर्व घेत आहोत, म्हणूनच मानव मुक्तीचा जाहीरनामा म्हणजे संविधान आहे, असे मत संविधान अभ्यासक आणि प्रचारक नूरखा पठाण यांनी व्यक्त केले.

ऑल इंडिया एस सी अँड एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन चिपळूण कमिटी व कोकण रेल्वे कर्मचारी वृंद चिपळूण रेल्वे स्टेशन यांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे आयोजन चिपळूण रेल्वे स्टेशन येथे करण्यात आले होते. यावेळी संविधान अभ्यासक नूरखा पठाण बोलत होते.

प्रथम सभेच्या वेळी धार्मिक विधी पार पडल्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमात पुढे बोलताना नूरखा पठाण म्हणाले की, महापुरुषांच्या योगदानामुळे त्यांच्या कार्यामुळे आपल्याला माणूस म्हणून खरी ओळख मिळालेली आहे. त्यांचे श्रेय फार मोठे आहे म्हणून आपण ताठ मानेने जगू शकतो. भारतीय संविधान निर्मितीमध्ये महापुरुषांचे विचार आणि त्यांनी वेगवेगळ्या कालखंडामध्ये केलेली क्रांती याचा सार दिसून येतो. संविधान म्हणजे जिवंत पुस्तक आहे. संविधान ज्या मूल्यांवरती आधारित आहे ती मूल्य म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही नैसर्गिक मूल्य आहेत. सर्वात प्रथम तथागत भगवान बुद्धानी याच विचार मूल्यांची ओळख संपूर्ण जगाला करून दिली. त्यामुळे ही मूल्य हाच संविधानाचा पाया आहे. क्रांती व प्रतिक्रांती करत महापुरुषांनी वेगवेगळ्या कालखंडात केलेली समाजसुधारणा आणि त्यांचे प्रयत्न हेच आपल्याला पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या अनुच्छेदांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेले दिसतात.

संत परंपरेचा आणि त्यांच्या विचारांचा दाखला देत त्यांनी हा मुद्दा समजून सांगितला. वारकरी संप्रदायामध्ये माऊली शब्द एकमेकांना भेटल्यावर बोलला जातो. माऊलीच्या शब्दांमध्येच समानता दिसून येते. म्हणजे अनुच्छेद १४ मध्ये समानता आणि बंधुत्वाची भावना मांडण्यात आली आहे. संत विचारातून ही भावना निर्माण झाली आणि त्यामुळे पुढे संविधानामध्ये अनुशेष 14 बाबासाहेब यांनी याच आधारे मांडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव सर्वात मोठ्या प्रमाणात संविधानावरती दिसून येतो. त्यावेळी जी वर्ण व्यवस्था आणि जातीची उतरंड असलेली व्यवस्था होती. त्याला छेद देत सर्वात प्रथम शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना “मावळा” ही ओळख करून दिली. सर्व जातीमध्ये नकळत समानतेची निर्माण केली. हीच प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतली आणि त्यामुळेच संविधानामध्ये आम्ही भारताचे लोक हे वाक्य आपल्याला आढळून दिसून येते. धर्मनिरपेक्षेचे तत्व सुद्धा स्वराज्यात शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा मांडले आणि त्यानंतर बाबासाहेबांनी घटनेत अनुच्छेदाच्या माध्यमातून आपल्याला दिले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने संविधान निर्मितीचे प्रेरणास्थानी शिवाजी महाराज होते असे बोलताना त्यांनी आवर्जून नमूद केले.

संविधानाने महिलांना पुरुषांपेक्षा उंच स्थान दिले आहे. त्यांनी महिलांसाठी अनुच्छेद १५(३) तीन मध्ये महिलांच्या व बालकांच्या उपाययोजना करण्यासाठी प्रतिबंध होणार नाही अशी तरतूद करून ठेवली. त्यामुळे आज महिलांचे अनेक कायदे आपल्याला स्वतंत्र झालेले दिसतात . त्यामध्ये 1990 मध्ये झालेल्या महिला आयोगाची स्थापना आणि स्त्रीभ्रूण प्रतिबंध कायदा असे अनेक कायदे संविधानांच्या चौकटीत बसवण्यात आले. त्यामुळे याचा फायदा निश्चितच महिलांना झाला आहे .
पुढे त्यांनी सामान्य माणसाने संविधान का समजून घेण्याची गरज आहे आणि ते कसे समजून घ्यायचे या संदर्भात सविस्तर माहिती दिली. संविधान केवळ कायद्याचे पुस्तक नव्हे तर कोणते कायदे बनवले जावेत याची दिशा देणारे पुस्तक आहे. याच पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे कायदे मंडळ, कार्यकारणी मंडळ आणि न्यायमंडळ स्थापन करण्यात आले आहे. यातूनच नागरिकांच्या हिताचे निर्णय संविधानाच्या चौकटीत बसून घेतले जातात. संविधान समजून घेताना वैचारिक क्रांती होणे फार गरजेचे आहे . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक देशाच्या नागरिकाला मालक बनवले आहे. पूर्वी जाती आधारित वर्णव्यवस्था होती पण संविधान लागू झाले आणि अनुच्छेद १४ नुसार समानतेने बदल घडवून आला. त्यामुळे सर्व जाती-धर्माच्या मध्ये एकसमानता दिसून येते. हा मोठा बदल संविधानामुळे घडून आला. सामाजिक चळवळीचा केंद्रबिंदू इथे दिसून येतो. या संविधानामुळेच राजकीय, सामाजिक व आर्थिक क्रांती घडून आली आणि देशाच्या प्रत्येक नागरिकांना या संविधानामुळे मूलभूत अधिकार आणि कर्तव्य सुद्धा प्राप्त झाली. बाबासाहेबांनी संविधान निर्माण करताना प्रत्येक महापुरुषांच्या कार्याचा अभ्यास करत त्यातील विचार संविधानात त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणूनच संविधान भारतातील व प्रत्येक नागरिकाला जगण्याचा स्वतंत्र अधिकार देते असे त्यांनी बोलताना सांगितले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी डॉ सतीश मदार होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष सतीश कांबळे, सचिव योगेश सावंत, दिपेश जाधव, नरेंद्र सावंत, वालोपे ग्रामपंचायत उपसरपंच सुनील मोहिते, पत्रकार ॲड संतोष कुळे, ॲड वृषाली सावंत, वसंत चिपळूणकर, असोसिएशनचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनीत गमरे यांनी केले.