माजी पं. स. सदस्या सौ. मधुरा चोपडेकर, मकरंद चोपडेकर यांसह अनेक ग्रामस्थ्यांचा भाजपात प्रवेश : माजी खासदार निलेश राणे व भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती
मालवण | प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी कुडाळ मालवण प्रभारी माजी खासदार निलेश राणे व भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपने देवबाग गावात ठाकरे गटाला धक्का दिला. ठाकरे गटाच्या माजी पं. स. सदस्या सौ. मधुरा चोपडेकर, मकरंद चोपडेकर यांसह अनेक ग्रामस्थानी बुधवारी भाजपात प्रवेश केला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांचे विशेष प्रेम देवबाग गावावर नेहमीच राहिले आहे. गेल्या काही वर्षात दत्ता सामंत सातत्याने देवबाग वासियांच्यां सोबत असतात. दर्जात्मक व शाश्वत विकासाला प्राधान्य दिले जात आहे. दत्ता सामंत यांनी ग्रामस्थांना दिलेला विकासाचा प्रत्येक शब्द आम्ही पक्ष म्हणून पूर्ण करू. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यातून विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही निलेश राणे यांनी प्रवेशकर्ते व ग्रामस्थ यांना दिली.
देवबाग येथील मत्स्यगंधा थिएटर मध्ये भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश बुधवारी संपन्न झाला. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी सभापती सुनील घाडीगावकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, राजा गावडे, माजी पं. स. सदस्य मधुरा चोपडेकर, देवबाग उपसरपंच घन:श्याम बिलये, स्वरा तांडेल, नादार तुळसकर, जयवंत सावंत, मकरंद चोपडेकर यांच्यासह भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, सहदेव साळगावकर, राजू बिडये, दत्ता चोपडेकर, दिनू कासवकर, बाबू कासवकर, पंकज मालंडकर, विलास बिलये, गणेश मोंडकर, नाना तांडेल, निलेश सामंत तसेच अन्य मान्यवर, स्थानिक ग्रामस्थ आणि पदाधिकारी उपस्थित होते.
निलेश राणे म्हणाले देवबाग बंधरा साठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक कोटी खासदार निधी त्यावेळी तातडीने दिला होता. मात्र ठाकरे सरकार काळात हे काम रखडून ठेवण्यात आले. मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, आणि त्यांना ग्रामस्थ्यांच्या दृष्टीने बंधारा महत्व पटवून दिले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या निधीला परवानगी दिली, पण मंत्रालयातून परवानगी मिळाली नाही. राणेंकडून निधी मिळाला तर राजकीय नुकसान होईल म्हणून ठाकरे सरकार आणि तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून द्वेषपोटी हा निधी अडवला गेला. त्यामुळे हे काम होऊ शकले नाही. मात्र आता केंद्रात आणि राज्यात आपलेच सरकार असून देवबाग गावातील बंधारा सरकार आणि राणे साहेबांच्या माध्यमातून करणार. दत्ता सामंत यांच्या पाठपुराव्यातून बंधरा काम पूर्ण करणार असे निलेश राणे म्हणाले.
देवबाग गावाला पर्यटनात जागतिक दर्जा प्राप्त झाला आहे.
अधिकाधिक पर्यटन विकास करणार. पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे मालवण कुडाळला विकासात झुकते माप देत आहेत. त्यामुळे देवबाग गावालाही अधिकाधिक विकास निधी मिळणार असे निलेश राणे म्हणाले.
कुडाळ मालवण मतदार संघात २०१४ नंतर अनेक रस्ते डांबरीकरण झाले नाहीत. हा मतदार संघ ओसाड पडला आहे. यापूर्वी आपल्या मतदार संघाला वेगळी ओळख होती. मात्र या नऊ वर्षात काहीच झाले नाही. पत्र देणे फोटोसेशन म्हणजे विकास नव्हे. मात्र आपल्याला शाश्वत विकास हवा. जनतेला अपेक्षित कामे करणे हे आमचे कर्तव्य राहील. असे निलेश राणे म्हणाले.
दत्ता सामंत म्हणाले, देवबाग मधील ठाकरे गटाच्या माजी पं. स. सदस्या मधुरा चोपडेकर, मकरंद चोपडेकर आज भाजपात प्रवेश करीत आहेत. २०२४ मध्ये निलेश राणे यांना आमदार करायचं आहे हे आम्ही सर्वांनी ठरवले आहे. सर्व ठिकाणी जनतेचाही उत्सपूर्त प्रतिसाद मिळत आहे. २०१९ च्या लोकसभेला निलेश राणे अपक्ष उभे होते त्यावेळीही ७० % मतदान देवबाग मधून त्यांना झाले. या गावात प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. विधायक आणि सामाजिक कामांची त्यांची मागणी असते. येथील ग्रामस्थ भाजपाच्या पाठीशी आहेत. निलेश राणे यांच्या प्रयत्नातून येथे साडेतेरा कोटींचा निधी आपण मागील काळात मंजूर करून घेतला आहे. भाजपाची सत्ता आल्यामुळे येथील बंधाऱ्याचा प्रश्न सुटणार आहे. येथील बंधारा कम रस्त्याचा प्रश्न भाजपाच्याच माध्यमातून सुटू शकतो. ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न सोडवणे नऊ वर्षात आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांना जमले नाही. पण आम्ही काही दिवसात हा प्रश्न सोडवला. हे भाजपचे काम आहे. आम्ही लोकांचे प्रश्न सोडवायला आलो आहोत. २०२४ मध्ये तुम्हाला दोन आमदार मिळणार आहेत. निलेश राणे हे विधानसभा आमदार असतील. मी यापुढे कायम त्यांच्या सोबतच असणार. निलेश राणे हे हुशार, अभ्यासू आहेत. त्यांच्या फोनला मंत्रालयात, प्रशासनात वजन आहे. असा आमदार जनतेला मिळाल्यास हा मतदारसंघ राज्यात अग्रस्थानी असेल. त्यामुळे येथील विकासासाठी त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करूया, असे आवाहन दत्ता सामंत यांनी केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनीही आपल्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वशैलीत विचार मांडले. १९९० मध्ये देवबाग गावचे संरक्षण करण्याचे काम नारायण राणे यांनीच केल्याची आठवण करून दिली. देवबाग गावच्या पर्यटन विकासाचे श्रेय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आहे. मात्र गेल्या 9 वर्षात येथील आमदार वैभव नाईक अपयशी ठरला. मात्र यापुढील आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून देवाबाग गावचा गतिमान विकास होईल. निलेश राणे यांच्यासारखा धडाकेबाज आमदार याठिकाणी हवे असल्याचे ते म्हणाले. भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनावडेकर यांनीही विचार मांडले.
देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार
केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार असून येत्या लोकसभा निवडणुकीत देशात पुन्हा लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार. असा ठाम विश्वास माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केला. राज्यात तर सगळेच भाजप सोबत आले आहेत. त्यामुळे आगामी काळातील राजकारण भाजपच्या अवतीभवतीच फिरणार आहे. असे निलेश राणे म्हणाले.












