महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा अनेक वैशिष्टपूर्ण लोककलांमुळे सांस्कृतिक विश्वात आपले वेगळेपण राखून आहे.
संस्कृती आणि सौंदर्याचा संगम यांचा आविष्कार असणाऱ्या सिंधुदुर्गाला स्वत:ची अशी एक वेगळी ओळख आहे ती इथल्या लोककलाची.
या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील अनमोलाचा ठेवा म्हणजे कोकणातील दशावतार.
धयकाला आणि दशावतार यांचे शतकानुशतके नाते….
आणि धयकालो म्हणजे सिंधुदुर्गातल्या लोकांचो जीव की प्राण…. दिवाळी संपली की, तुळशी विवाहच्या अगोदर पासुनच वेध लागतात ते गावागावतील साजरे होणाऱ्या धयकाल्याचे.. सिंधुदुर्गात ब-याच गावात ग्रामदेवतेची सालाबादची जत्रा असते.
जत्रेत काय, तर मालवणी खाजाच्या दुकानापासून चहा भज्यांची दुकाने, लहान मुलांसाठी खेळणीची दुकाने, फुगेवाले, पेपारेवाले अशा सगळयांची तोबा गर्दी….
कोकणात जितकी मजा चतुर्थीच्या सणाक,शिमगोत्सावात, तितकीच हया धयकाल्याक…
दहिकाला म्हणजे जणू नात्यागोत्यांतील माणसांना, सगेसोय-यांना भेटण्याचे हक्काचे ठिकाण. प्रत्येकासाठी ती एक आनंदाची पर्वणी. थंडीच्या वातावरणात गळयामध्ये मफलर अडकवलेल्या व ठेवणीचे कपडे घातलेल्या खास पोषाखात जत्रेतील नवनवे चेहरे पाहत फिरणे हा तर इथल्या तरुणाईचा आवडता विषय अगदी जत्रेतल्या गरमागरम भजी इतकाच चविष्ठ.
कार्तिक, मार्गशीर्ष, पौष या तीन महिन्यात दहिकाला नामक जत्रा गावोगाव केल्या जातात. प्रत्येक गावच्या तिथीप्रमाणे, त्या त्या गावी रितीरिवाजा नुसार दशावतारी मंडळे आपली कला सादर करतात.
जत्रेच्या दिवशी गावातील ग्रामदेवतेच्या मंदिरात (मंदिरा समोर) हा कार्यक्रम पार पाडला जातो.
कोकणी माणुस आजही तितकीच श्रद्धापूर्वक वागताना दिसतो एरवी कुणालाही न घाबरता बिनधास्त पणे वागणारा कोकणी माणूस घाबरतो तो आपल्या ग्रामदेवतेला तिच्या बारा पाच गावराठीला आणि इथेच त्याचा माथा टेकतो..तो हि श्रद्धापूर्वक…
कितीही मोठ्या पदावर असो वा कितीही महत्त्वाच्या कामात असो कोणतं ही कारण न देता आपल्या ग्रामदेवतेची धयकाल्यात भेट घेत त्याला श्रध्देने नारळ केळी,पेढे, अर्पित करून जत्रेत अनेकांना हाका मारत चहा भज्यांचा आनंद घेत आपलं माणुसपण जपणारा सच्चा माणुस अनुभवायला मिळतो तो हि या धयकाल्यात.
खरं तर अगदी आठ दिवसांपासून गावातील लोक धयकाल्याची तयारी करतात.मंदिरे स्वच्छ केली जातात रस्त्या रस्त्यावर तरूणाई रांगोळी काढत वातावरणात चैतन्य आणते.काही मंदिरे रंगरंगोटी करून सज्ज धयकाल्या साठी होतात.
गावात गाडींची वर्दळ वाढते अनोळखी चेहरे दिसतात विविध भागातील व्यावसायिक आपल्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवण्यासाठी गावकऱ्यांना विश्वासात घेत एका दोन दिवसांसाठी दुकाने मांडतात गाव हा मग गाव राहतच नाही तर ती स्वप्नं नगरी बनते..
प्रत्येका कडून आनंद ओसाडुन वाहातो..
विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघतो.. धयकाल्या दिवशी अगदी पहाटेला ढोल ताशे,सनई अशी वाद्ये वातावरणात प्रसन्न करतात पहाटे देवतेच्या विधीवत पूजा केल्या जातात सुर्याची कोवळी किरणे मंदिर परिसर तोजोमय करताना भाविक आपल्या देवाच्या चरणावर श्रद्धापूर्वक नमस्कार करतात.मंदिरातील देव हार फुलांनी भरून जातो.लाऊड स्पीकर च्या आवाजाने जुन्या आठवणी परत ताज्या होतात.
दिवस कसा संपतो ते कळतही नाही.
तोबा गर्दीतून वाट काढत एक माणसांनी भरलेली गाडी मंदिर परिसरात दाखल होते .. लोकं त्या गाडीच्या आजुबाजुला गर्दी करतात..
या मध्ये आपल्या आवडी निवडी चे चेहरे निरखून घेतात..
अर्थात धयकाल्यात रंग भरणाऱ्या दशावतारी कलावंताची ती गाडी असते पंरपरे नुसार गाडीची जागा,पेटाऱ्याची जागा, कलावंत मेकअप करण्याची जागा गावातील देवस्थानातील प्रमुख मानकरी उपलब्ध करून देतात.
सुर्य अस्ताला जातो आणि धयकाल्याला रंग चढतो रात्री दहाच्या सुमारास ग्रामदेवतेचा पालखी,तरंग देवते सह प्रदक्षिणा सुरू होतो महासागर उसळावा अगदी तसाच भाविकांचा जनसागर उसळतो.
देवतांच्या पुढे ढोल,ताशा,
सनईचे वादन उत्सवात रंग भरते.पालखी सोबत मानकरी मंडळी आपले जुने रितीरिवाज जपत या भावसागरात हरपुन जातात. पालखी सोहळ्यात गाणी, मंगलाष्टकांचे उंच स्वर अल्हाददायक वाटतात संबंधित नाट्य मंडळातीला मृदुंग वादक, झांज वादक ही या पालखी सोहळ्यात नाट्य मंडळाचे प्रतिनिधी म्हणून सेवा बजावतात..
कोकणच्या धयकाल्याचे एक विशेष आकर्षण असते ते पालखी सोहळ्यात फटाक्यांची होणारी लक्ष्यवेधी आतषबाजी.
बऱ्याच ठिकाणी अगदी पन्नास हजार ते लाखोंचे फटाके लावले जातात सगळा परिसर कानठळ्या बसणाऱ्या आवाजाने ग्रासला जातो.
पालखी सोहळ्या नंतर धयकाल्याला सुरवात होते आड दशावतारात संकासुर मालवणी भाषेतुन विनोद सादर करत नाट्य प्रारंभी रंग भरतो.
इतर कलावंत सादरीकरणासाठी सज्ज होतात रात्री मुख्य कथानकाला एक दोन घ्या सुमारास सुरवात होतं पहाटे पाच सहा हे कथानक सपते.
पंरपरेनुसार दहिहंडी नाट्य मंडळातील कृष्ण होणाऱ्या कलावंता करवी फोडून धयकाल्याची सांगता होते गावचा वार्षिक उत्सव संपतो दशावताराची गाडी वेग घेते.. पुढच्या वर्षी परत धयकाल्याची जत्रा करायची म्हणून ..
आपल्या पंरपरा इमानदारीने न खंड पाडता सांभाळणाऱ्या पारंपरिक मंडळाच्या मालकाचा संचालकाचा, दशावतारी कलावंताचा विचार आम्हाला केव्हाच पडत नाही .
आमच्या गावचे धयकाले सादर करताना त्यांनी घातलेला ताळमेळ आपण कधीच माणूस म्हणून बघत नाही.
काही काही गावात धयकाल्याची जत्रा करत असताना रंगमंचा समोर चार माणसं नसतानाही केवळ मालक, संचालक, कलावंत देवासाठी नाटक पहाटे पर्यंत सादर करतात कारण त्यांना देव महत्त्वाचा वाटतो तो देवळात आहे आणि त्याच्या साठी मला रात्रभर जागर केला पाहिजे हि भावना केवळ आणि केवळ दशावतारात पहायला मिळते.
आज रूढी परंपरा नुसार धयकाल्याची जत्रा रात्री १नंतर सुरू होते कलावंत नीट झोप मिळतं नाही तरी ते आपल्यासाठी पंरपरा रूढी जपण्यासाठी हे सगळे करतात, पारंपरिक दशावतार मंडळे चालवणं हे आज मोठं आव्हान झाले आहे कारण खर्चाचा आणि मिळकतीचा ताळमेळ काही केल्या बसत नाही.
केवळ देवसेवा आणि पुर्वजित पंरपरा म्हणून धयकाल्याची जत्रा केल्या जातात.
आज महागाई आकाशाला भिडली तरी हे मालक , संचालक आपल्या सेवेत कमी पडत नाही.
आज शासन दरबारी दशावतार उपेक्षित आहे.आज जी हि लोककला जपली जाते ती केवळ आणि केवळ रसिकांच्या आवडीवर . त्यामुळे दशावतार लोककलावंतच्या व्यथा वेदना झोपी गेलेल्या आणि गेंड्याची कातडी असलेल्या शासनाला सांगणं म्हणजे झोपेचे सोंग घेऊन झोपलेल्या जाग करण्यासारखं होईल.
म्हणून आपण सगळे एक होवुन वार्षिक धयकाल्याची जत्रा करताना महागाईचा विचार करायलाच हवा . पन्नास हजारांचे फटाके फोडून पैसा वाया घालवण्यापेक्षा चाळीस हजाराचे फटाके लावुन निदान दहा हजार तरी या आपल्या दशावतार जपणाऱ्या लोकांना देऊया.
देव कधीच दगडात नसतो तो माणसांत आहे मग माणसातल्या देवाचा आशीर्वाद घेऊया..
धयकाल्यात जसा इतर गोष्टीवर खर्च करताना आपण ते सगळं देवा साठी करतो या भावनेने करतो तीच भावना धयकाला सादर करणाऱ्या दशावतार मंडळाच्या बाबतीत ठेवली तर ह्या पंरपरा रूढी अधिक उत्साहाने जपल्या जातात.
आज दशावतार लोककला जिवंत आहे ती केवळ रसिक कलावंत आणि मालक, संचालक यांच्या मुळेच म्हणून एकमेकांना हात देऊया…
धयकाल्यात फटाके लावाच पण आमच्याकडे लक्ष्य ठेवा…गाववाल्यानू.
शब्दांकन -प्रा.वैभव खानोलकर
सिंधुदुर्ग












