रत्नागिरी | प्रतिनिधी : गेले अनेक वर्ष रखडलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आमच सरकार आल्यावर वर्षभरातच रत्नागिरीत सुरु झाल आहे, हेच आमच गतिमान सरकार आहे. या सरकारची सर्वसामान्यांची नाळ जोडलेली आहे. इथली आणि राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करणे ही आमची जबाबदारी असून विविध योजना आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून ही जबाबदारी आम्ही पूर्ण करत आहोत अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये आले होते. यावेळी त्यांच्यासमवेत वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकीरण पूजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, माजी आमदार विनय नातू, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहराध्यक्ष बिपीन बंदरकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, हे सरकार सर्वसामान्यांचे आहे, हे फेसबुक सरकार नाही, त्यामुळे रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न बराचकाळ रेंगाळला आहे हे समजल्यानंतर अगदी गोहाटी आणि गोवा येथूनच या प्रश्नावर आम्ही काम करण्यास सुरुवात केली आणि दिलेले आश्वासन पूर्ण केले. राज्यातील जनतेला चांगले आरोग्य मिळाले पाहिजे हा आमचा आग्रह आहे. त्यामुळेच या संबंधी अनेक प्रश्न तातडीने सोडवले जातात. रुग्णालयातील पुरेसा औषध पुरवठा, आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण, रिक्त पदांची भरती आदी प्रश्न सोडवण्यास सुरुवात झाली असून सरकारी रुग्णालयातही कॅश लेस सुविधा सुरु केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर वर्षभरात मुख्यमंत्री सहायता निधीमधून १६० कोटी रुपयांची मदत जनतेसाठी उपलब्ध केली असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकार म्हणून आमची सामुहिक जबाबदारी असून समाजातील महिला, युवक, बालके, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी शासन वेगवेगळ्या योजनांतून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणासह रत्नागिरीचा विकास वेगाने होत असून रत्नागिरी विमानतळासाठी ११८ कोटी रुपये वितरीत केले गेले आहेत. नमो ११ योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी, दिव्यांगांसाठी भरीव मदत केली जात आहे असेही ते म्हणाले.
शासन आणि प्रशासन हे सर्वसामान्यांसाठी काम करत असतात. मी अनेकदा प्रोटोकॉल तोडून थेट जनतेला भेटायला जातो, मला कोणीही नागरिक पूर्वपरवानगी न घेता भेटू शकतो जिल्हाधिकार्यांनी आणि पोलीस अधिकार्यांनीही जनतेसाठी अशी वेळेची बंधने ठेवू नये, अडलेला, त्रस्त झालेला माणूसच तुम्हाला भेत्याला आलेला असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे, त्यातून त्यांचे छोटे छोटे प्रश्न सुटत असतात अशा कानपिचक्या मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या.












