चालक वाहकांच्या मुजोरीचा प्रवाशांना मनस्ताप
राजापूर (वार्ताहर): मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर तालुक्यातील खरवते गोरेवाडी येथे नव्याने विनंती थांबा मंजूर असताना राजापूर आगारातील चालक वाहक या ठिकाणी येता जाताना बस थांबवत नसल्याने येथील प्रवाशांतून तिव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबई गोवा महामार्गावर खरवते गोरे वाडी येथे नव्याने बस थांबा मंजूर झालेला आहे. यापुर्वी या ठिकाणी बसथांबा नसल्याने नेरकेवाडी अथवा खरवते बस थांब्यावर उतरून येथील प्रवाशांना दोन किमीची पायपीट करून घर गाठावे लागत असे.
मात्र महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर या ठिकाणी अधिकृत विनंती थांबा मंजूर असताना व राजापूर आगाराच्या या ठिकाणी बस थांबविण्याच्या सूचना असताना आगारातील चालक वाहन अनेकदा या ठिकाणी बस थांबविण्यासाठी प्रवाशांशी उध्दट वर्तन करीत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
जर दोन किमी अंतर चालून घर गाठावे लागत असेल तर एसटीने प्रवास का करावा असा सवाल येथील वृध्द व महिला प्रवाशांनी केला असून या ठिकाणी अधिकृत थांबा असताना बस न थांबविणाऱ्या चालक व वाहकांविरोधात विभाग नियंत्रकाकडे तक्रार करणार असल्याचे या प्रवाशांनी सांगितले.
——————————————————











