निराधार आजारी वृद्धाला सामाजिक बांधिलकीने दिलं जीवदान

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील भटवाडी येथील लक्ष्मी नारायण मंदिरा समोर आजारी अवस्थेत पडलेल्या कुसगाव कुडाळ येथील दीपक जाधव नामक निराधार वृद्धाला सामाजिक बांधिलकी संघटने कडून जीवदान देण्यात आले. हा वृद्ध जर्जर अवस्थेत पडला असल्याची माहिती सामाजिक बांधिलकीला मिळताच सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव, संजय पेडणेकर, शामराव हळदणकर व सुजय सावंत यांनी तेथे धाव घेतली व सदर वृद्ध व्यक्तीला कोरगावकर यांच्या ॲम्बुलन्स मध्ये घालून पोलिसांच्या मदतीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

यासाठी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे हवालदार पी.के कदम, संतोष गलोले व कोरगावकर यांचे सहकार्य लाभले. सदर रुग्ण पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याला त्याच्या राहत्या घरी कुसगाव येथे सोडण्याची जबाबदारी सामाजिक बांधिलकी संघटनेने घेतली आहे.