एचएसएनसी विद्यापीठ मुंबईच्या कुलगुरू प्रा. हेमलता बागला यांची प्रमुख उपस्थिती
वैभववाडी l प्रतिनिधी : माध्यमिक विद्यालय करुळ प्रशालेत ई. लर्निंग क्लासरूम चे उद्घाटन एच. एस. एन. सी. विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. हेमलता बागला यांच्या शुभहस्ते पार पडले. एच. एस.एन. सी. विद्यापीठ मुंबई किशनचंद चेल्लाराम महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने या ठिकाणी ई. लर्निग क्लासरूम उभारण्यात आला आहे. या क्लासरूमच्या शुभारंभ प्रसंगी श्री. बागला, के. सी. महाविद्यालय मुंबई प्राचार्य डॉ. तेजश्री शानबाग, इंजिनीअर्स विदाऊट बॉर्डर्स भारतचे संचालक श्री अनिल राय, राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालय संचालक डॉ. सतीश कोलते, श्री अश्विन पवार, डॉ. प्रतीक्षा कदम, मुख्याध्यापक दीपक घाटगे, सरपंच नरेंद्र कोलते व गावातील पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात लेझीम नृत्य व फुगडी सादरीकरणाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांची विद्यार्थ्यांनी मने जिंकली. यावेळी हेमलता बागला म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या स्वागताने आपण भारावून गेलो. कोकणची संस्कृती या ठिकाणी पहावयास मिळाली. या डिजिटल क्लासरूम चा पुरेपूर फायदा विद्यार्थ्यांनी करून घ्यावा असे सांगितले. अनिल राय म्हणाले, इंजिनियर्स विदाऊट बॉर्डर त्यांच्या वतीने जवळपास १२५ विद्यालयामध्ये ई. लर्निंग क्लासरूम भरण्यात आले आहेत. या क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीचे शिक्षण घेणे सोयीचे झाले आहे. यापुढेही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील असे सांगितले. यावेळी सरपंच नरेंद्र कोलते, प्राचार्या डॉ. तेजश्री शानबाग, मुख्याध्यापक दीपक घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशालेचा विद्यार्थी पार्थ पवार यांनी इंग्रजीतून भाषण करत सर्वांची मने जिंकली.के. सी. महाविद्यालयाच्या वतीने करुळ ग्रामपंचायतसाठी पुस्तकांची भेट देण्यात आली. ई. लर्निंग क्लासरूम मध्ये प्रोजेक्टर, बेंच कॉम्प्युटर यासह इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. माध्यमिक विद्यालय करुळ मधील विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळीची मान्यवरांनी पाहणी केली. व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला के. सी. महाविद्यालय मुंबई एन. एस. एस. विभागाचे १०० विद्यार्थी उपस्थित होते. तसेच माध्यमिक विद्यालय करूळ प्रशालेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव पाटील व डॉ. प्रतीक्षा कदम यांनी केले. तर आभार अर्चना पाटील यांनी मानले.












