खेड(प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील महाडनजीकच्या राजवाडीजवळ औंदुबर छाया ट्रॅव्हल्सच्या खासगी आराम बसचा बर्निंग थरार टायर फुटल्यानेच घडल्याचे समोर आले आहे. या अपघाताने खासगी आराम बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता ऐरणीवर आली असून साऱ्यांनीच धसका घेतला आहे.
औंदुबर छाया ट्रॅव्हल्सच्या बसमधून (एम.एच. ०८ ई. ९७७९) १९ प्रवाशांना घेवून चालक गुलशन पठाण रत्नागिरी येथून मुंबईला जात होता. महाड राजवाडीनजीक बस आली असता अचानक फुटलेल्या टायरने पेटही घेतल्याने धुराचा वास येवू लागला. बसमधून प्रवास करणाऱ्या रत्नागिरी- भाटीमिया येथील आर्यन भाटकर, आकांक्षा भाटकर या दोन भावंडांना काहीतरी जळत असल्याचे लक्षात येताच त्यांनी ही बाब कुटुंबियांसह चालकाच्या निदर्शनास आणून दिली. चालकानेही प्रसंगावधान राखत बस तातडीने रस्त्यालगत उभी करून बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला होता. काही क्षणातच खासगी आराम बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. बसला झालेला अपघात फुटलेल्या टायरमुळेच झाल्याचे उघड झाले आहे.










