दै. प्रहारचे झुंजार पेडणेकर उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित

मालवण पत्रकार समिती पुरस्कारांचे वितरण : उद्योजक डॉ. दीपक परब मालवण रत्न व तारक कांबळी यांचा कलारत्न पुरस्काराने गौरव

मालवण | प्रतिनिधी : पत्रकार भवन उभारणी करताना सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ एकसंघपणे दिशादर्शक असे काम करत आहे. मालवण पत्रकार समितीची वाटचालही उल्लेखनीय अशीच आहे. पत्रकारांनी अश्याच प्रकारे संघटीत राहून आदर्शवत काम करत करावे. असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेच्या उपाध्यक्षा तथा अधीस्वीकृती समिती सदस्या जान्हवी पाटील यांनी मालवण येथे बोलताना केले.

मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पत्रकार पुरस्कार व मालवणरत्न व कला रत्न या विशेष पुरस्कारांचा वितरण सोहळा स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय सभागृहात संपन्न झाला.

यावेळी मराठी पत्रकार परिषदेच्या उपाध्यक्षा जान्हवी पाटील प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. यावेळी विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, पत्रकार समितीचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर, आ. वैभव नाईक, सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, प्रभारी प्राचार्य कैलास राबते, पत्रकार समितीचे तालुकाध्यक्ष संतोष गावडे, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत सामंत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश सरनाईक,भाऊ सामंत, नितीन वाळके यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक अध्यक्ष संतोष गावडे यांनी करून पत्रकार समिती वाटचाल विषद केली.

याप्रसंगी स्व. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार झुंजार पेडणेकर, स्व. नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार पत्रकार महेंद्र पराडकर, अमित खोत पुरस्कृत बेस्ट स्टोरी पुरस्कार प्रशांत हिंदळेकर, तसेच मालवण रत्न पुरस्कार उद्योजक दिपक परब, कलारत्न पुरस्कार रंगभुषाकार तारक कांबळी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पर्यावरण पुरक गणेशोत्सव सजावट स्पर्धेतील विजेते भुषण मेतर, मनोज चव्हाण, केशव भोगले यांनाही प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देउन सन्मानित करण्यात आले.

उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर म्हणाले, इलेक्टॉनिक मिडीयाचे आव्हान असले तरी वर्तमानपत्रांनी स्पेशल स्टोरीच्या माध्यमातुन वेगळेपणा जपला पाहिजे. पत्रकार संरक्षण कायद्यासाठी पत्रकारांनी संघटीत होणे गरजेचे असल्याचे जान्हवी पाटील म्हणाल्या. यावेळी नंदकिशोर महाजन, नितीन वाळके, प्रा. कैलास राबते, उमेश तोरसकर व अन्य मान्यवर यांनी मनोगत व्यक्त केले. पुरस्कार प्राप्त महेद्र पराडकर यांनी गाबित समाजामुळेच आपण पत्रकारिता क्षेत्रात वीस वर्षे काम करु शकलो असे सांगत सर्वांचे योगदान मिळाल्याचे सांगितले. प्रशांत हिंदळेकर यांनी सर्व पत्रकारांच्या सहकार्यामुळेच बेस्ट स्टोरी पुरस्कार प्राप्त झाल्याचे सांगितले. पत्रकारीतामुळे ग्रामीण भागातील समस्या प्रभावीपणे मांडता आल्याचे झुंजार पेडणेकर यांनी सांगित कुटुंबीय व सर्वांचे योगदान बहुमूल्य असल्याचे सांगितले.

यावेळी उपाध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, कृष्णा ढोलम, खजिनदार सिद्धेश आचरेकर, प्रफुल्ल देसाई, अमित खोत, परेश सावंत, पी. के. चौकेकर, उदय बापार्डेकर, अर्जुन बापार्डेकर, अनिल तोंडवळकर, समीर म्हाडगुत, कुणाल मांजरेकर, महेश कदम, नितीन आचरेकर, नितीन गावडे, शैलेश मसुरकर, विशाल वाईरकर, भुषण मेतर, भाऊ भोगले, आप्पा मालंडकर आदि उपस्थित होते. सुत्रसंचालन संग्राम कासले यांनी केले. पुरस्कार सन्मानपत्र वाचन अमित खोत यांनी केले.