पेडणे : प्रतिनिधी
धारगळ येथील साईराज पेट्रोल पंपावर एका कार चालकाने बनावट नोटा देऊन कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन हजार रुपयांचे पेट्रोल भरून त्या बदल्यात लहान मुलांच्या खेळण्यातील ५०० रुपयांच्या नोटा देऊन कार चालक पसार झाला. याबाबत पेडणे पोलिसात पेट्रोल पंप चालकाने फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास धारगळ येथील साईराज पेट्रोल पंपावर एक कार पेट्रोल भरण्यासाठी आली. चालकाने पंपवरील कर्मचाऱ्यास २ हजार रुपयांचे पेट्रोल भरण्यास सांगितले. त्यानंतर चिल्ड्रन्स बँक असे नमूद असलेल्या ५०० रुपयांच्या चार नोटा देऊन तो पसार झाला. उशिराने कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली.
पेट्रोल पंप मालकाने याबाबत पेडणे पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. उप निरीक्षक योगेश मांद्रेकर अधिक तपास करीत आहेत. या फसवणूक घटनेने गोव्यात खळबळ उडाली आहे.












