मातोश्रीच्या स्मरणार्थ रमेश चव्हाण यांनी पाटपन्हाळे हायस्कूलला दिली पुस्तक संच भेटवस्तू

Google search engine
Google search engine

पाटपन्हाळे l वार्ताहर :  कै.सौ.जनाबाई तुकाराम चव्हाण यांच्या स्मरणार्थ पुणे येथील श्री. रमेश तुकाराम चव्हाण यांनी गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयाला सुमारे १६० पुस्तकांचा संच देणगीरूपाने भेटवस्तू नुकतीच पाटपन्हाळे हायस्कूलमध्ये पुस्तक वितरण कार्यक्रमात देऊन शैक्षणिक उपक्रम राबविला.पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधाकर चव्हाण , संचालक अनंत चव्हाण व मुख्याध्यापक श्री.एम.ए.थरकार यांच्याकडे पुस्तक वितरण कार्यक्रमानिमित्त पुस्तक संच सुपूर्द केला.

पुणे येथील श्री.रमेश तुकाराम चव्हाण यांच्या मातोश्री कै.सौ.जनाबाई तुकाराम चव्हाण यांनी वाचनाची आवड , उत्तम पाठांतर ही कौशल्ये वयाच्या ७५ व्या वर्षापर्यंत जोपासलेली होती.शैक्षणिक कार्याने आईची स्मृती राहावी या हेतूने श्री.रमेश तुकाराम चव्हाण यांनी मनोरंजनात्मक , बोधात्मक , विविध मराठी साहित्यिक व कवी , वैज्ञानिक , पर्यावरणविषयक अशा विविध विषयांनुसार सुमारे १६० पुस्तकांचा संच देणगीरुपी भेटवस्तू न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात पुस्तक वितरण समारंभात दिली. सदर शैक्षणिक कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून देणगीदार रमेश तुकाराम चव्हाण , पत्नी सौ.गीता चव्हाण , कन्या योगिता चव्हाण , शिरळ ग्रामपंचायत सदस्या संगीता मोरे , पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधाकर चव्हाण , संचालक अनंत चव्हाण , मुख्याध्यापक एम.ए. थरकार , सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी श्री.एस.एम.आंबेकर , सौ.एन.पी.वैद्य हे उपस्थित होते.सदर कार्यक्रमासाठी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयातर्फे मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले . देणगीदार रमेश चव्हाण यांनी मातोश्रींच्या इच्छापूर्तीसाठी व आईची शैक्षणिक आठवण म्हणून असा शालेयपयोगी उपक्रम राबविला आहे. उपक्रमातून विद्यार्थ्यांना ज्ञान संपादन करता येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य वाढण्याच्या हेतूने असा उपक्रम पाटपन्हाळे हायस्कूलच्या सहकार्याने राबविण्यात आल्याचे सांगितले. तसेच आगामी काळात विद्यार्थ्यांना विविध विषयांबाबतची पुस्तके वितरीत करण्याचा मानसही श्री.रमेश चव्हाण यांनी व्यक्त केला. पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधाकर चव्हाण यांनी रमेश चव्हाण यांनी पुस्तकरुपी देणगी पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित पाटपन्हाळे हायस्कूलसाठी देऊन लाभलेल्या सहकार्याबद्दल चव्हाण परिवाराला धन्यवाद दिले . विविध पुस्तके वाचून विद्यार्थ्यांना ज्ञान संपादन करता येईल . विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचण्याची सवय लागून अभ्यासवृत्ती वाढेल असे मार्गदर्शनात्मक विचार व्यक्त केले . मुख्याध्यापक श्री.एम.ए. थरकार यांनी रमेश चव्हाण व परिवाराने पाटपन्हाळे हायस्कूलसाठी पुस्तकरुपी भेट दिल्याबद्दल धन्यवाद दिले. पुस्तकरूपी भेटवस्तूतून शाळा व विद्यार्थी यांना फायदा होणार आहे . विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके वाचून वाचन कौशल्य आत्मसात करायला हवे . ज्ञान संपादनासाठी पुस्तकांचे मोल खूप मोठे आहे . विद्यार्थ्यांनी वाचन प्रवृत्ती अंगीकारली पाहिजे असे मार्गदर्शनात्मक विचार मुख्याध्यापक एम.ए.थरकार यांनी व्यक्त केले. सहाय्यक शिक्षिका सौ.एन.पी.वैद्य यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून रमेश चव्हाण व परिवाराने पुस्तकसंच भेटवस्तू विद्यालयाला दिल्याबद्दल व उपस्थित मान्यवरांच्या सहकार्याबद्दल आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.