केंद्रीय मंत्री नारायण राणे रविवारी ७ एप्रिल रोजी लांजा दौऱ्यावर

सभेच्या नियोजनासाठी भाजपा पक्ष कार्यालयात पार पडली बैठक 

लांजा (प्रतिनिधी) कोकणचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रविवारी ७ एप्रिल रोजी लांजा दौऱ्यावर येत असून या निमित्ताने त्यांच्या या दौऱ्याचे नियोजन करण्या संदर्भातील भाजपाची बैठक आज गुरुवारी ४ एप्रिल रोजी सायंकाळी शहरातील भाजपा पक्ष कार्यालयात पार पडली.

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपा पक्षाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. त्यादृष्टीने केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रविवारी ७ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता लांजा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली लांजा शहरातील अजिंक्य मंगल कार्यालय या ठिकाणी दुपारी तीन वाजता कार्यकर्ता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे तालुक्याचे सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहेत. तसेच लोकसभा निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.

लांजा दौऱ्यावर येणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे लांजा तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीने जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर लांजा दौऱ्यावर येणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या या सभेचे नियोजन करण्यासंदर्भातील बैठक लांजा तालुका भाजपा पक्ष कार्यालयात आज गुरुवारी पार पडली .या बैठकीला भाजपाचे लांजा तालुका अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, शहराध्यक्ष गुरुप्रसाद तेली, जिल्हा उपाध्यक्ष महेश खामकर ,प्रभाकर टोळे,, जिल्हा सरचिटणीस हेमंत शेट्ये ,तसेच संजय आयरे, नगरसेवक आणि भाजपा युवा मोर्चाचे संजय यादव, नगरसेवक मंगेश लांजेकर, तालुका सरचिटणीस विराज हरमले, ॲड सुमंत वाघदरे ,पदाधिकारी विजय कुरूप आदींसह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान रविवारी ७ एप्रिल रोजी होणाऱ्या या बैठकीला तालुक्यातील भाजपाच्या सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, शहराध्यक्ष गुरुप्रसाद तेली यांनी केले आहे.